Parenting Tips: पालकांसाठी त्यांचे मुल हेच त्यांचे आयुष्य असते. तर दुसरीकडे मुलांसाठीसुद्धा आईवडील हेच त्यांचे संपूर्ण जग असते. लहानपणापासून मिळालेले प्रेम मुलांना आयुष्यभर आत्मविश्वासपूर्ण आणि मजबूत बनवते. जर मुलांचे आपल्या पालकांशी घट्ट नाते असेल तर ते आयुष्यात चांगल्या मार्गाने पुढे जाऊ शकतात. परंतु अनेक मुले अशीही असतात ज्यांना आपल्या पालकांशी तितकासा संपर्क साधता येत नाही. आणि त्यामुळे कालांतराने त्यांच्यातील अंतर वाढत जाते. अशा स्थितीत त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. ज्याप्रमाणे पालकांसोबत नातेसंबंध उत्तम राहण्यासाठी मुलांना काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे पालकांनासुद्धा काही नियम पाळण्याची गरज असते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर पालकांना आपल्या मुलाशी आपले नाते अतूट करायचे असेल तर आजपासून काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. पालकांनी पाल्यासोबत बोलताना, वागताना काही लहान-लहान गोष्टींमध्ये बदल केल्यास अत्यंत चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. बऱ्याचवेळा पालक कामाच्या व्यापात किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना मुलांच्या मानसिक गरजांकडे दुर्लक्ष करतात. अशात त्यांच्या भावना दुखावल्या जातात शिवाय गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे पालकांनीसुद्धा काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
ठराविक वयापर्यंत प्रत्येक मुलाला आपल्या पालकांच्या वेळेची आवश्यकता असते. अशा काळात मुलांची शारीरिक शिवाय बौद्धिक वाढ होत असते. त्यामुळे त्यांना विविध गोष्टी समजू लागतात. त्यामुळेच आपल्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवा. आपल्या मुलासोबतवेळ घालवणे तुमच्या मजबूत नातेसंबंधासाठी खूप महत्वाचे आहे. यावेळी तुम्ही त्यांच्याशी खेळा, संवाद साधा, वाचायला शिकवा, मार्गदर्शन करा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या. यामुळे त्यांची आत्मसंवेदनशीलता आणि आत्मसन्मान वाढेल आणि तुमच्यामध्ये दृढ संबंध निर्माण होईल.
बऱ्याचवेळा पालक आपल्या मुलांच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सतत त्यांच्या वाईट गोष्टींबाबत चर्चा करता. मात्र असे केल्याने मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे ही सवय बदलण्याची गरज आहे. याउलट तुम्ही मुलांशी सकारात्मक संवाद साधा. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी द्या. त्यांच्याकडून झालेलया चुकांमधून सकारात्मक मार्ग शोधून देण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास मुले तुमच्यावर अधिक विश्वास ठेऊन तुमच्याशी कनेक्ट होतील.
प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांच्या पाठिंब्याची गरज असते. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत त्यांना पालकांचा मानसिक आधार हवा असतो. आयुष्यात यश मिळो किंवा अपयश प्रत्येक गोष्टीत मुलांना पाठिंबा द्या. त्यांचा आत्मविश्वास वाढवा. आयुष्यात त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा. अपयश मिळाल्याने त्यांना खचून जाऊ देऊ नका. अशाने तुमचे मुलांसोबतचे नाते प्रचंड मजबूत होईल. आणि प्रेम वाढेल.
प्रत्येक मुलाची जडणघडण ही त्यांच्या घरातून व्हायला सुरुवात होते. त्यामुळे घरात असणाऱ्या वातावरणाचा परिणाम त्यांच्या मनावर आणि वागण्यावर होत असतो. त्यामुळे घराचे वातावरण असे ठेवा की त्यांना कुटुंबात सुरक्षित वाटेल. यासाठी घरी काही स्पष्ट नियम बनवा जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत. आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा आणि कधीही वाईट शब्दांचा वापर करू नका. कुटुंबात सुट्टीच्या दिवशी एकत्र बसून गप्पागोष्टी करा किंवा मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करा.
संबंधित बातम्या