Parents Habits That Spoil Kids Future: पालक आपल्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी बरीच मेहनत करत असतात. क्वचितच असा कोणी पालक असेल जो आपल्या मुलाबद्दल वाईट विचार करेल. पण कधी कधी पालकांच्या काही वाईट सवयी मुलांच्या भविष्याच्या शत्रू बनतात. मुलांचे चांगले संगोपन करून, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवूनही त्यांची पावले चुकीच्या मार्गावर पडतात. मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी पालकांनी त्यांच्या या वाईट सवयी आजच सोडल्या पाहिजे. या सवयी कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
अनेक वेळा पालक आपल्या पार्टनरचा किंवा ऑफिसचा राग, चिडचिज मुलांवर काढू लागतात. असे पालक लहानसहान गोष्टींवरून मुलांना रागवतात, मारतात किंवा ओरडत असतात. हळूहळू मुलांना सतत रागवणे ही त्यांची सवय बनते. काही काळानंतर त्याचा मुलांवरही विपरीत परिणाम होऊ लागतो. अशी मुले त्यांच्या पालकांना नापसंत तर करतातच पण त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करायलाही घाबरतात. एवढेच नाही तर अशी मुलांचा स्वभावही रागीट होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या मुलांशी नेहमी प्रेमाने वागा.
अनेक वेळा पालक आपल्या मुलांच्या काही सवयींमुळे नाराज होतात आणि त्यांना वाईट बोलू लागतात. पण असे अजिबात करू नका. चांगले पालकत्व म्हणजे तुम्ही कितीही रागावले किंवा नाराज असलात तरी हे मुलासमोर व्यक्त करू नका.
बहुतांश पालकांमध्ये ही सवय दिसून येते. असे पालक अनेकदा आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करून त्यांचे मनोधैर्य खचवतात. लक्षात ठेवा प्रत्येक मुलाची स्वतःची खास अशी विशेषता असते. त्यामुळे तुमच्या मुलाची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका. मुलाला त्याच्याचील विशेषता सांगून त्याला नेहमी प्रोत्साहन द्या.
मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण केल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. अनेक वेळा पालक मुलांनी काही मागण्याआधीच त्याला सर्व आणून देतात. तुमच्या या सवयीचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. मुलासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना पालकांनी नेहमी लक्षात ठेवावे की मुलाला त्या वस्तूची खरोखर गरज किती आहे.
आजकाल आई-वडील व्यस्त असल्याने वेळ घालवण्यासाठी मुलांना मोबाईल देतात. त्यामुळे मुलं आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन आणि गॅजेट्समध्ये घालवतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या डोळ्यांवर आणि मानसिक आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत तुमच्या सवयी बदला आणि तुमच्या मुलासोबत थोडा वेळ घालवा. मुलाला मैदानात खेळण्यास प्रोत्साहित करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)