Tips to Improve Eye Health of Kids: हल्ली लहान वयात मुलांना चष्मा लागलेला पहायला मिळते. चष्मा संदर्भातील नियम पाळणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टी स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. प्रत्येक पालक आपल्या मुलांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. शारीरिक, मानसिक आरोग्यासोबतच त्यांचे डोळ्यांचे आरोग्य राखणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. आपल्या मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पालकांसाठी या टिप्स उपयुक्त ठरू शकतात. नाशिक येथील डॉ अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटलच्या सल्लागार नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शुभांगी पिंपरीकर यांनी काही उपयुक्त टिप्स शेअर केल्या आहेत.
मुलांनी सकाळपासून रात्रीपर्यंत चष्मा लावणे आवश्यक आहे. नियमित वापरामुळे मुलांना स्पष्ट दिसण्यास मदत होते आणि भविष्यात अधिक मात्रेच्या प्रिस्क्रिप्शनची गरज भासत नाही. या नियमितपणामुळे मुलाच्या दृष्टीची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि सध्याचे प्रिस्क्रिप्शन कायम राखण्यात मदत होते.
चष्मा योग्य प्रकारे डोळ्यांवर व कानांवर बसणे आवश्यक आहे. तुमच्या मुलाच्या चेहऱ्याला सुयोग्य अशा आकाराच्या फ्रेमची निवड करावी. मुलांना चष्मा काळजीपूर्वक हाताळण्यास सांगावे. चष्मा काढताना व लावताना दोन्ही हातांचा वापर करण्यास सांगावे, जेणेकरुन फ्रेम किंवा काच तुटणार नाही.
चष्म्यातून स्पष्ट दिसावे, यासाठी तुमच्या मुलाचा चष्मा रोज स्वच्छ करावा. काचेला चरे पडू नयेत किंवा डाग पडू नयेत, यासाठी सौम्य क्लीनर व मऊ कापडाचा वापर करावा.
चष्मा वापरात नसेल तेव्हा तो चष्म्याच्या केसमध्ये सुरक्षित ठेवावा, जेणेकरून तुटणार नाही. चष्मा केसमध्ये ठेवताना काच वरच्या बाजूला ठेवावी
डोळ्यांवर ताण येऊ नये यासाठी तुमच्या मुलाला २०-२०-२० नियम फॉलो करायला सांगावे. हा नियम म्हणजे दर २० मिनिटांनी स्क्रीनपासून २० सेकंदांचा ब्रेक घ्यावा आणि २० फुट लांब पाहावे
टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाइल अशा सर्व स्क्रीनचा मर्यादित वापर करवा. दिवसातून केवळ २०-२५ मिनिटांचा स्क्रीन टाइम असावा. यामुळे डोळ्यांवर कमी ताण येतो आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवावा. बाहेर अधिक काळ राहिल्याने डोळ्यांना फायदा होतो आणि मायोपियाची वाढ कमी होण्यास मदत होते
तुमच्या मुलाला पुरेसे ड जीवनसत्व मिळेल याची खात्री करावी. कारण व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे एकुण आरोग्यावर परिणाम होतो. अशी प्रकारची कमी असलेली स्थिती असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुमच्या मुलांच्या दृष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी दर सहा महिन्यांनी नेत्र तज्ज्ञाकडून डोळ्यांची तपासणी करून घ्या आणि प्रिस्क्रिप्शनमध्ये आवश्यक बदल करून घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)