Kitchen Hacks In Marathi: भारतीय संस्कृतींमध्ये खाद्यसंस्कृतीला विशेष महत्व आहे. आपल्या भोजनात अनेक चमचमीत खाद्यपदार्थ असतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे पनीर होय. अगदी सणासुदीच्या दिवसांपासून लग्न समारंभासारख्या खास कार्यक्रमांमध्ये पनीरचे विविध पदार्थ पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात पनीरचा वापर प्रचंड वाढला आहे. पनीरचे चमचमीत पदार्थ तर बनवलेच जातात शिवाय पनीरचा डाएटमध्येसुद्धा समावेश केला जातो. तसेच सध्या शाकाहारी लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे पनीर असे चित्र आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत मऊ आणि मलईदार पनीर सर्वजण आवडीने खातात. पनीरमुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते.
परंतु बहुतांश लोकांना बाजारात मिळणारे पनीर खरेदी करणे पसंत नसते. घरातील वृद्ध, लहान मुले पनीर खात असल्याने जास्तीत-जास्त फ्रेश पनीरचा वापर व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळेच अनेकांना बाहेरून पनीर घेताना मनात काहीशी शंका असते. परंतु आता तुम्हाला याबाबत चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही अगदी घरच्या-घरी बेकरीसारखे मऊ, मलईदार आणि अगदी क्रिमी पनीर घरातच बनवू शकता. घरी पनीर बनवताना काही जणांची रेसिपी फसते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला पनीरची अगदी योग्य रेसिपी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला बेकरीसारखे मलईदार पनीर बनवता यावे.
-दूध- १ लिटर
-१-२ चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर
-१/२ टीस्पून मीठ (इच्छेनुसार)
ताजे दूध फाडून पनीर बनवले जाते. काही लोक उष्णतेमुळे किंवा इतर कारणांमुळे फाटलेल्या दुधापासून पनीर बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना अपेक्षेप्रमाणे चांगले परिणाम मिळू शकत नाहीत. त्यामुळे नेहमीच पनीर बनवताना ताजे दूध घेणे गरजेचे आहे. यासोबतच लक्षात ठेवा की जर तुम्हाला बेकरीसारखे मऊ आणि मलईदार पनीर बनवायचे असेल तर दूध फाडण्यासाठी फक्त १-२ चमचे लिंबाचा रस वापरावा लागेल. परफेक्ट पनीर बनवण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीने दूध नासवणे योग्य नाही. या गोष्टी लक्षात ठेवल्या तरच बेकरीसारखे पनीर तुम्हाला घरच्या-घरी मिळू शकते.
सर्वप्रथम एका जाड तळाच्या भांड्यामध्ये दूध गरम करायाला ठेवा. दूध उकळायला लागल्यावर गॅस कमी करा किंवा गॅस बंद करा. एका कपमध्ये २ चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घ्या आणि त्यात समान प्रमाणात पाणी घालून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण हळूहळू गरम दुधात मिसळा. त्यानंतर चमच्याने दूध नीट ढवळून घ्यावे. लगेचच तुम्हाला दिसेल की, पनीरसारखा भाग दुधापासून वेगळा होईल. जर दूध वेगळे होत नसेल तर अशावेळी आणखी थोडे थेंब लिंबाचा रस किंवा व्हिनेगर त्यात घाला. त्यानंतर एका भांड्यात एक मोठी चाळणी ठेवा आणि त्यावर मलमलचे मऊ कापड किंवा फिल्टरिंग कापड ठेवा. त्यात सर्व दूध ओता. पनीरमधील पाणी गाळणीच्या खाली भांड्यात जाईल आणि चीज कापडावर राहील.
आता कापडावर राहिलेले पनीर थंड पाण्याने धुवा म्हणजे त्यातीलच लिंबाचा आंबटपणा निघून जाईल.आणि पनीरची चव चांगली राहण्यास मदत होईल. कापड घट्ट बांधून घ्या म्हणजे पनीरमधील पाणी पूर्णपणे निघून जाईल. एका प्लेटमध्ये वरची बाजू खाली ठेवून त्यावर पनीरची पोटली हाताने दाबून ठेवा. नंतर त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवा म्हणजे पनीर एकजीव घन होईल आणि त्यातील राहिलेले पाणी प्लेटमध्ये जमा होईल. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर पनीर फ्रिजमध्ये ठेऊन द्या. थंड झाल्यांनंतर ते अगदी बेकरीसारखे मऊ आणि मलईदार बनेल. या टिप्स फॉलो करून पनीर बनवल्यास कधीच चुकणार नाही.