Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

May 16, 2024 11:51 PM IST

Health Care Tips: सामान्य कर्करोगापैकी एक असलेला ओव्हेरियन कॅन्सरची वेळीच तपासणी केली तर त्यावर मात करणे शक्य आहे.

ओव्हेरियन कॅन्सरची तपासणी
ओव्हेरियन कॅन्सरची तपासणी ( unsplash)

Ovarian Cancer Screening: ओव्हेरियन कॅन्सर (अंडाशयाचा कर्करोग) हा देशातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. या कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरतो. ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी सीए-१२५ रक्त आणि ट्रान्सव्हॅजायनल अल्ट्रासाऊंड (TVUS) सोबत रोमा (ROMA)चा निदानपर्याय तसेच ओटीपोटात दुखणे, असह्य वेदना आणि सूज येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ओव्हेरियन कॅन्सरची (अंडाशयाचा कर्करोग) सुरुवात बीजांडातून होते आणि हा एक सर्वात प्राणघातक कर्करोग आहे, ज्यामुळे देशातील सर्वाधिक मृत्यूचे कारण ठरत आहे. मुंबई येथील अपोलो डायग्नोस्टिकचे नॅशनल टेक्निकल हेड अण्ड चीफ पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजेश बेंद्रे यांनी याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

ही आहेत लक्षणे

ओव्हेरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ही इतर सर्वसामान्य लक्षणांसारखीच असतात. पोट फुगल्यासारखं वाटणं, धाप लागणं, वारंवार लघवीला जावं लागणं, ॲसिडिटीचा त्रास, मासिक पाळीत अनियमितता इत्यादी अस्पष्ट लक्षणांमुळे प्राथमिक टप्प्यात दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते. हे वयोवृध्द महिला तसेच ३० वर्षावरील तरुण स्त्रियांमध्ये दिसून येते. यामध्ये जोखमीचे घटक म्हणजे गर्भधारणा, अकाली मासिक पाळी, उशीरा रजोनिवृत्ती, तंबाखू, धूम्रपान, उशीरा गर्भधारणा, लठ्ठपणा आणि कौटुंबिक इतिहास यांचा समावेश होतो. या कर्करोगाचे वेळीच निदान आणि उपचारांमुळे रुग्णांचे जगण्याचे प्रमाण वाढते.

ओव्हेरियन कॅन्सरच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या चाचण्या

गर्भाशयाच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी सर्वात महत्वाची चाचणी म्हणजे CA-125 रक्त चाचणी, जी गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या स्त्रियांमध्ये उच्च प्रथिनांची पातळी मोजण्यास मदत करते. तुमचे डॉक्टरच तुम्हाला या चाचणीचा पर्याय निवडण्याचा सल्ला देईल. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जोखमीचे निदान करण्यासाठी ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड ही आणखी एक चाचणी आहे. सीटी स्कॅन सारख्या इतर चाचण्या बीजांडातील असामान्यता ओळखण्यात मदत करू शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका ओळखता येऊ शकतो. शिवाय बायोप्सीसारख्या निदान पद्धती वेळीच निदान आणि एखाद्याचा जीव वाचविण्यास फायदेशीर ठरत आहे. २५ वर्षांनंतरच्या स्त्रियांनी नियमितपणे गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करुन घेणे आणि योग्य वेळी निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे. या कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी नियमित तपासणी आणि डॉक्टरांकडे फॅालोअप करणे गरजेचे आहे.

डॉक्टर ट्यूमरची लक्षणे, टप्पा आणि स्थान यानुसार उपचार ठरवतात. एखाद्याला केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा टार्गेटेड थेरपीसह शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाईल. डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आणि जीवनाचा दर्जा सुधारणे अत्यावश्यक आहे. या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी निरोगी आहाराचे सेवन करा, दररोज व्यायाम करा आणि धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन टाळा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner