Peshawari Kadhai Gosht Recipe: जर तुम्ही नॉनव्हेजिटेरियन असाल आणि तुमचा वीकेंड स्पेशल बनवण्यासाठी चविष्ट मटण बनवण्याचा विचार करत असाल तर पेशावरी कढई गोश्त तुमची इच्छा पूर्ण करू शकेल. पेशावरी गोश्त किंवा कढाई गोश्त ही पाकिस्तानी नॉनव्हेज रेसिपी आहे जी मटण आणि अगदी कमी मसाले वापरून बनवली जाते. ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला चविष्ट आहे. ही रेसिपी तुम्ही रोटी, नान किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घ्या पेशावरी कढई गोश्तची रेसिपी
- १ किलो मटण दीड इंचाचे तुकडे
- ५-६ मध्यम आकाराचे टोमॅटो
- ५-६ हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापून)
- २ चमचे आले चिरून
- २ चमचे लसूण चिरलेला
- २ चमचे चिरलेली कोथिंबीर
- अर्धा कप तूप
- २ चमचे मीठ
हे बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून क्रिस-क्रॉस पद्धतीने कापून घ्या. आता एक पॅन मोठ्या आचेवर ठेवा आणि त्यात ३-४ कप पाणी गरम करा. पाण्याला उकळी आल्यावर पॅनमध्ये टोमॅटो घालून झाकण ठेवून ३-४ मिनिटे शिजू द्या. आता पॅन गॅसवरून काढा आणि टोमॅटो १०-१५ मिनिटे थंड होऊ द्या. यानंतर टोमॅटो पाण्यातून काढून त्याची साल काढा. आता पॅन मोठ्या आचेवर ठेवा आणि त्यात तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात मटण आणि मीठ घालून ४-५ मिनिटे परतून घ्या. पॅनला घट्ट बसणारे झाकण ठेवा आणि मंद आचेवर २०-२५ मिनिटे शिजवा. मध्ये मध्ये मटण ढवळत राहा. आता सोललेले टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर पॅन पुन्हा झाकून ठेवा आणि एक तास किंवा मटण मऊ होईपर्यंत शिजवा.
मटण शिजवताना टोमॅटो चमच्याच्या मागच्या बाजूने मॅश करत रहा. लक्षात ठेवा की मटणामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज नाही. कारण मटण स्वतःच्या रसात शिजेल. पण मटण शिजताना ग्रेव्ही सुकत आहे किंवा पॅनच्या तळाला चिकटत आहे असे वाटत असेल तर थोडे पाणी घालू शकता. मटण कोथिंबिरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.