विदर्भातील प्रसिद्ध ‘सिंगल-कॉटन पट्टी किनार' साड्यांचा वारसा जतन करण्यासाठी NIFT संस्थेचा पुढाकार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  विदर्भातील प्रसिद्ध ‘सिंगल-कॉटन पट्टी किनार' साड्यांचा वारसा जतन करण्यासाठी NIFT संस्थेचा पुढाकार

विदर्भातील प्रसिद्ध ‘सिंगल-कॉटन पट्टी किनार' साड्यांचा वारसा जतन करण्यासाठी NIFT संस्थेचा पुढाकार

Updated Feb 11, 2025 01:26 PM IST

सिंगल-कॉटन धाग्यापासून पट्टी किनार साड्या तयार केल्या जातात. आकर्षक डिझाईन अन् मनमोहक नक्षीदार बुटीजसाठी त्या ओळखल्या जातात.

विदर्भातील धापेवाडा येथील ‘सिंगल-कॉटन पट्टी किनार' साड्यांचा वारसा जतन करण्यासाठी NIFTचा पुढाकार
विदर्भातील धापेवाडा येथील ‘सिंगल-कॉटन पट्टी किनार' साड्यांचा वारसा जतन करण्यासाठी NIFTचा पुढाकार

विदर्भातील धापेवाडा गावातील सिंगल-कॉटन पट्टी किनार साड्यांचा समृद्ध असा पारंपरिक हस्तकला वारसा जतन करण्यासाठी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT- National Institute of Fashion Technology) या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. सध्य यंत्र आधारित वस्त्रनिर्मितीच्या रेट्यामुळे साधे पण उठावदार, नजाकतदार असे हे हातमाग वस्त्रनिर्मितीची परंपरा लयास जाते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेतर्फे भारताच्या पारंपारिक हस्तकलेचे जतन करणे आणि हे कलाशास्त्र समजून घेण्यासाठी हस्तकला संशोधन दस्तऐवजीकरण केले जाते. निफ्टचे प्राध्यापक संदीप किडीले यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे विद्यार्थी विदर्भातील पट्टी किनार साड्यांच्या विणकाम परंपरेचा मागोवा घेत असून या टीम प्रत्यक्ष धापेवाडा गावात जाऊन पट्टी किनार साड्यांचे विणकाम करण्याची पद्धत, कलाकुसर जाणून घेऊन कारागिरांशी संवाद साधला.

पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा

अतिरिक्त विणण्याच्या तंत्राचा (एक्स्ट्रा वेफ्ट टेक्निक) वापर करून, सिंगल-कॉटन धाग्यापासून पट्टी किनार साड्या तयार केल्या जातात. आकर्षक डिझाईन अन् मनमोहक नक्षीदार बुटीजसाठी त्या ओळखल्या जातात. यात विणकरांचे अतिशय तपशीलवार काम दिसते. सूक्ष्म डिटेलिंग आणि आकृतिबंध प्रत्येक साडीला अधिक युनिक अन् स्पेशल बनवतात. प्रत्येक पट्टी किनार साडीची लांबी ६.५ मीटर असते आणि त्यात ३-इंच साधा बॉर्डर असतो, जो एक साधा पण सुंदर सौंदर्य साज देतो. 

यंत्र-आधारित वस्त्रनिर्मितीच्या रेट्यापुढे हस्तकलेच्या परंपरेला धोका

मशीन-निर्मित कापडांच्या स्वस्त अन् मुबलक उपलब्धतेमुळे बाजारात या पारंपरिक साड्यांची मागणी कमी झाली आहे. यामुळे कारागिरांच्या उपजीविकेलाही धोका निर्माण झाला आहे. एकेकाळी भरभराटीला आलेल्या अनेक सहकारी संस्था आता उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आर्थिक अस्थिरता आणि मर्यादित संधींचा सामना करणारी विणकरांची तरुण पिढी या कलाकृतीपासून दूर जात आहे. सरकारी पातळीवर त्वरित हस्तक्षेप न केल्यास, विदर्भाचा हा मौल्यवान वस्त्र कला वारसा लयास जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी तरुण कारागिरांना प्रशिक्षण, समकालीन डिझाइन एकत्रित करणे, व्यापक बाजारपेठेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास जागतिक ग्राहकांना आकर्षित होऊन या कलाकृतीमध्ये नवीन प्राण फुंकू शकतात. यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीसोबत पर्यटनालाही चालना मिळू शकते.

‘एनआयएफटी ही संस्था विदर्भाच्या या वारशाचे जतन अन् पुनरुज्जीवनासाठी समर्पित असून धापेवाडाचा विणकामाचा वारसा चमकत राहील याची आम्हाला खात्री आहे, असं मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, मुंबई येथे कार्यरत प्राध्यापक संदीप किडीले यांनी व्यक्त केलं.  'शिक्षण, नावीन्य आणि बाजारपेठ विस्ताराद्वारे आम्ही या कलेचे चांगले भविष्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. फॅशन जगतात पट्टी किनार साड्यांसाठी नक्कीच मजबूत अन् सुरक्षित जागा मिळेल, हा आमचा विश्वास आहे. ही कला जतन करणे केवळ कापड जपण्याबद्दल मर्यादित नाही, तर इतिहास, संस्कृती आणि हा वारसा जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांचा सन्मान करण्यासारखे आहे, असंही प्रा. किडीले म्हणाले.

 

Haaris Rahim Shaikh

TwittereMail

हारीस शेख हे हिंदुस्तान टाइम्स -मराठीचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (ऑनलाइन)चे संपादक म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी मटा (ऑनलाइन)चे दिल्ली प्रतिनिधी, ईटीव्ही -मुंबई ब्युरोमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले. टिव्ही, प्रिंट आणि डिजिटल न्यूज माध्यम क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा अनुभव. राजकारण, अर्थजगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर नियमित लिखाण.

Whats_app_banner