New Year Travel : सुंदर समुद्र किनारा अन् नितळ पाणी, 'महाराष्ट्राच्या मॉरिशस'मध्ये करा नव्या वर्षाचं स्वागत!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  New Year Travel : सुंदर समुद्र किनारा अन् नितळ पाणी, 'महाराष्ट्राच्या मॉरिशस'मध्ये करा नव्या वर्षाचं स्वागत!

New Year Travel : सुंदर समुद्र किनारा अन् नितळ पाणी, 'महाराष्ट्राच्या मॉरिशस'मध्ये करा नव्या वर्षाचं स्वागत!

Dec 09, 2024 03:07 PM IST

New Year Travel At Tarkarli Beach : यावर्षी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लान करत असाल, तर तुम्ही ‘महाराष्ट्राच्या मॉरिशस’ला नक्कीच भेट देऊ शकता.

New Year Travel At Tarkarli Beach
New Year Travel At Tarkarli Beach

New Year Travel At Tarkarli : नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आता सगळेच तयार झाले आहेत. २०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक उरले आहे.  या दरम्यान अनेक लोक आपल्या मित्रपरिवारासोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लान करतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. या दरम्यान बऱ्याच सुट्ट्या येत असल्याने फिरण्याची देखील एक चांगली संधी चालून आलेली असते. अशावेळी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक लोक आपल्या कुटुंबासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतात. यावर्षी तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लान करत असाल, तर तुम्ही ‘महाराष्ट्राच्या मॉरिशस’ला नक्कीच भेट देऊ शकता. महाराष्ट्राचा मॉरिशस अर्थात कोकणचा तारकर्ली समुद्रकिनारा.  

महाराष्ट्रात मालवणजवळ तारकर्ली समुद्रकिनारा असून, तो खूप प्रसिद्ध आहे. तारकर्ली समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ नितळ पाण्यामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. इथल्या स्वच्छ आणि नितळ पाण्यामुळे स्कुबा डायव्हिंगसारख्या जलक्रीडा करण्यासाठी परदेशातूनही अनेक पर्यटक येथे येत असतात. स्वच्छ पाण्यामुळे समुद्राच्या अंतरंगात डोकवण्याची संधी प्रत्येकाला मिळते. शिवाय कोकणात असल्याने कोकणातील चविष्ट पदार्थांची चव देखील इथे चाखायला मिळते. तुम्ही देखील तारकर्लीला जाण्याचा विचार करत असाल, तर इथे कसं पोहोचायचं आणि काय काय बघायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तारकर्लीला कसं पोहोचाल?

तारकर्लीला जाण्यासाठी तुम्ही सिंधुदुर्ग किंवा कुडाळ या स्थानकांवर उतरून बस पकडून मालवण गाठू शकता. मालवणात पोहोचल्यावर तुम्ही मालवणमध्ये सुद्धा राहू शकता किंवा एसटी पकडून तारकर्लीला जाऊन तिथे एखाद्या हॉटेलमध्ये राहू शकता. मालवण ते तारकर्ली हे सात किलोमीटरचे अंतर आहे. तिथे जाण्या-येण्यासाठी तुम्ही रिक्षा किंवा एसटी असे पर्याय वापरू शकता. मात्र, तारकर्लीमध्ये आधीच खूप गर्दी असल्याने हॉटेल्स बुकिंग तसे मर्यादितच असतात. त्यामुळे तिथे जाण्याआधीच हॉटेल बुकिंग करून, तुम्ही आपला वेळ वाचवू शकता.  

Road Trip: भारतातील ५ सर्वात सुंदर हायवे, आयुष्यभर आठवणीत राहील येथील ट्रीप, लगेच करा प्लॅन

काय काय बघाल?

मालवण, सिंधुदुर्ग, तारकर्ली हा सगळा परिसर पहायचा असेल तर तुमच्याकडे किमान दोन ते तीन दिवसाचा वेळ असणं आवश्यक आहे. तर, फक्त तारकर्ली फिरण्याचा विचार जरी करत असाल, तर तुम्हाला इथे अनेक गोष्टी पाहता येतील.  इथल्या समुद्रात भेट देण्यासारखे चार पॉईंट्स आहेत. यासाठी तुम्हाला बोटिंग करावी लागते. बोटिंगच्या राउंड ट्रीपसाठी प्रत्येक फॅमिलीला साधारणता हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागतात. या दरम्यान समुद्रात १५ किलोमीटर पर्यंत फिरवलं जातं. याशिवाय इथं डॉल्फिन पॉईंट, गोल्डन रॉक, त्सुनामी आयलँड आणि संगम अशी चार ठिकाणं पाहायला मिळतात. 

संगम पॉईंट : तारकर्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा ज्या ठिकाणी संगम होतो, त्या संगमाला ‘संगम पॉईंट’ असं नाव देण्यात आला आहे. नदीच्या शांत पाण्यातून समुद्राच्या लाटांमध्ये जाताना एक वेगळाच थरार येथे अनुभवायला मिळतो. 

डॉल्फिन पॉईंट : तारकर्ली समुद्रात डॉल्फिन देखील हमखास दिसतात. डॉल्फिन पाहण्यासाठी देखील लोक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. कधीकधी एक दोन नव्हे तर दहा-पंधरा डॉल्फिन इथं मुशाफिरी करताना दिसतात. 

गोल्डन रॉक पॉईंट : पुढे गोल्डन रॉक नावाचा एक पॉईंट आहे. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका कातळावर सूर्यप्रकाश पडला की, तो सोन्यासारखा चमकू लागतो म्हणूनच त्याला ‘गोल्डन रॉक’ असं नाव देण्यात आलं आहे. 

त्सुनामी आयलंड पॉईंट : गोल्डन रॉक पाहिल्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात शेवटचा पॉईंट म्हणजेच त्सुनामी आयलँड बघण्याची संधी मिळते. २००४मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे हे बेट तयार झाले, असे म्हटले जाते. या छोट्याशा बेटावर बोटींमधून वॉटर स्पोर्ट्स करण्याची सुविधा आहे. तसेच, इथे काही स्टॉल्सवर आईस्क्रीम, सरबत, पोहे आणि घावणे हे पदार्थ चाखण्याची संधी देखील. मात्र, भरतीच्या वेळी या बेटावर पाणी असल्याने केवळ ओहोटीच्या दरम्यान तुम्हाला ह्या बेटावर जाता येतं.  याशिवाय या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग आणि इतर अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद देखील घेता येतो.  

तर, या सुट्टीत तुम्ही तुमच्या कुटुंबाला कोकण फिरायला नेत असाल, तर तारकर्लीला नक्कीच भेट द्या.

Whats_app_banner