मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Colorectal Cancer: सावधना! शरीरात दिसणाऱ्या या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष, असू शकते कोलोरेक्टल कर्करोगाचे लक्षण

Colorectal Cancer: सावधना! शरीरात दिसणाऱ्या या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष, असू शकते कोलोरेक्टल कर्करोगाचे लक्षण

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 24, 2024 10:25 PM IST

Colon Cancer: अनेक वेळा शरीरात दिसणाऱ्या छोट्या गोष्टी कर्करोगाच्या असू शकतात. याकडे दुर्लक्ष करू नये. जाणून घ्या कोलोरेक्टल कर्करोगाचे लक्षणं.

कोलोरेक्टल कर्करोगाचे लक्षण
कोलोरेक्टल कर्करोगाचे लक्षण (unsplash)

Symptoms of Colorectal Cancer: कोलोरेक्टल किंवा कोलन कर्करोग याला मोठ्या आतड्याचा कर्करोग असेही म्हणतात. मोठे आतडे हे पाचन तंत्राचा अंतिम भाग म्हणून कार्यरत असते. जरी हे प्रामुख्याने वयस्कर व्यक्तींना प्रभावित करत असले तरी, आता कोलोरेक्टल कर्करोग तरुणांमध्ये पहायला मिळत आहे. गुदाशय आणि कोलन पेशींची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा कर्करोग होतो. कोलन कॅन्सर टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी करणे गरजेचे आहे, अशी माहिती नानावटी मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर केअर येथील हेपॅटोबिलरी पॅनक्रियाटिक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. गणेश नागराजन यांनी दिली.

काही प्रकरणांमध्ये पॉलीप्ससह कोलोरेक्टल कर्करोगही अनुवंशिक असतात. कोलोरेक्टल कॅन्सर विकसित झाल्यास शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी (रेक्टल कॅन्सरसाठी), आणि केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी सारखेया विविध उपचार पध्दतीचा वापर केला जातो. लवकर बरे होण्यासाठी रोबोटिक किंवा लॅप्रोस्कोपिक तंत्राद्वारे कमीतकमी प्रवेश शस्त्रक्रिया केली जाते. परंतु या कर्करोगाची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे ही काळाची गरज ठरत आहे.

ही आहेत कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे

बद्धकोष्ठता, आतड्यांमधील रक्त, गुदाशयातील रक्तस्राव, पोटदुखी, वारंवार गॅस होणं, काळा किंवा गडद रंगाचा मल आणि अशक्तपणा ही कोलोरेक्टल (मोठ्या आतड्याचा) कॅन्सरची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास घाबरून न जाता लगेचच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच आजाराचे निदान आणि उपचार झाल्यास हा कॅन्सर बरा होऊ शकतो. कोलन कॅन्सरची इतर संभाव्य चिन्हे म्हणजे शौचांनंतरही पोट साफ न होणे, अशक्तपणा किंवा थकवा आणि अचानक वजन कमी होणे. गुदाशय रक्तस्राव किंवा शौचावाटे रक्त येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका आणि वेळ न दवडता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लक्षणांबद्दल जागरूक राहून कोणतेही बदलांसाठी वैद्यकीय उपचार पर्याय निवडणे गरजेचे आहे.

बहुतेकदा विष्ठेचा रंग बदलून तो लाल किंवा काळा पडण्यासारखे चिन्ह किंवा लक्षण दिसून येतात. अशावेळी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. काही वेळी गुदद्वारातून रक्तस्त्राव होत असल्यास तो मूळव्याधीसारख्या सर्वसाधारण आजारामुळे होत असेल असे गृहित धरुन चूकीचे उपचार केले जातात आणि कर्करोग गंभीर टप्प्यावर पोहोचतो. कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे आढळल्यानंतर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. प्रभावी उपचारांसाठी आणि जगण्याचा दर वाढवण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरत आहे.

 

नियमित तपासणी केल्यास कोणत्याही प्रकारची असामान्यता शोधण्यात मदत होऊ शकते. नियमित कोलोनोस्कोपी किंवा तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या चाचण्या वेळच्यावेळी केल्याल कोलोरेक्टल कर्करोग हा त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखता येऊ शकतो. हा सक्रिय दृष्टीकोन मृत्यू दर कमी करण्यासाठी आणि या रोगाने बाधितांसाठी रोगनिदान सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel