मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sleep Apnea: स्त्रियांमधील ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियाकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, जाणून घ्या

Sleep Apnea: स्त्रियांमधील ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियाकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, जाणून घ्या

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 31, 2024 09:47 PM IST

Women Health Tips: स्लीप अ‍ॅप्निया एक प्रकारचा झोपेचा विकार आहे. ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो. महिलांनी याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

स्त्रियांमधील ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया
स्त्रियांमधील ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (unsplash)

Obstructive Sleep Apnea in Women: स्लीप अ‍ॅप्निया एक प्रकारचा झोपेचा विकार आहे. ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियामध्ये व्यक्तीच्या घशाचे स्नायू शिथिल होतात आणि श्वासनलिकेत अडथळा निर्माण करतात त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास देखील बंद होऊ शकतो त्यामुळे ती व्यक्ती घोरते. स्लीप अ‍ॅप्निया हे पूर्वी प्रामुख्याने पुरुषांवर परिणाम करणारे म्हणून ओळखले जात होते. मात्र आता स्त्रियांमध्ये स्लीप एपनियाचे प्रमाण वाढले आहे. घोरणाऱ्या किंवा जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्ये हे सर्रासपणे दिसून येते. निद्रानाश, झोपेचे वेळापत्रक बिघडणे, चिंता, नैराश्य किंवा डोकेदुखी यासारखी लक्षणे अनुभवणाऱ्या कोणत्याही महिलेला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (OSA) ची समस्या असू शकते. ओएसएचे चुकीचे निदान केले जाते आणि योग्य उपचार न झाल्यामुळे अनेकदा गुंतागुंत वाढते.

स्लीप अ‍ॅप्निया ही एक गंभीर श्वसन समस्या आहे जिथे एखाद्या व्यक्तीला झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळे येतात किंवा वरच्या श्वासनलिकेत अडथळा निर्माण झाल्यामुळे ती व्यक्ती अनेकदा घोरते. झोपताना, शरीर शिथिल होते, ज्यामुळे तोंड, जीभ आणि टाळूमधील स्नायू देखील शिथिल होतात आणि वायुमार्गात अडथळा निर्माण होतो, असे डॉ प्रीती धिंग्रा, ईएनटी सर्जन, लीलावती हॉस्पिटल यांनी स्पष्ट केले.

ओएसएचा धोका वाढविणाऱ्या घटकांमध्ये रजोनिवृत्ती, मद्यपान, धूम्रपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव आदी घटक कारणीभूत ठरतात. या जोखीम घटकांबद्दल जागरूक असणे आणि एखाद्याच्या आरोग्यास प्राधान्य देणे महत्वाचे आहे. ओएसए असलेल्या रुग्णांना हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक आणि अनियमित हृदयाचे ठोके यांसारख्या गुंतागुंत होण्याचा धोका असतो. वेळीच निदान आणि उपचार एखाद्याला या समस्येतून लवकर बरे करु शकते. या स्थितीचे निदान करण्यासाठी झोपेचा अभ्यास केला जातो. अभ्यासादरम्यान तुमच्या झोपेची पद्धत विविध पैलूंचा मागोवा ठेवण्यासाठी सेन्सर्सने सुसज्ज असे मॉनिटर तुमच्या शरीरावर चिकटवले जातात. यामध्ये झोपेचा कालावधी, गुणवत्ता, झोपेत येणारा व्यत्यय, ऑक्सिजनची पातळी, हृदयाच्या ठोक्यांचा वेग, रक्तदाब आणि श्वसनाची लय तपासली जाते. यावरुन तुमच्या स्थितीची तीव्र,सौम्य, मध्यम किंवा गंभीर श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. पॉलीप्स किंवा सायनस सारख्या गुंतागुंत ओळखण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी सखोल तपासणी केली जाते. ज्या प्रकरणांमध्ये श्वासनलिकेत अडथळे आल्याने घोरणे आणि श्वसनक्रिया बंद पडते, तो भाग शोधून तज्ज्ञाद्वारे नाकातून स्लीप एंडोस्कोपी नावाची एक विशेष प्रक्रिया केली जाऊ शकते असेही डॉ. प्रीती धिंग्रा यांनी स्पष्ट केले.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (OSA) असलेल्या महिलांना अनेकदा कमी लेखले जाते, ज्यामुळे उपचार न केल्यास त्याचे घातक परिणाम होतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया हा उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक आणि मायोकार्डियल इन्फेक्शन यांसारख्या इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी जोखमीचा घटक म्हणून ओळखला जातो. इन्सुलिन प्रतिरोध आणि टाइप २ मधुमेहामध्ये देखील स्लीप ॲप्नीयाची तक्रार आढळून येते. ओएसए असलेल्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, हार्मोनल असंतुलन आणि मानसिक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नीया असलेल्या महिलांना जीवनशैली बदलण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. उपचार न केलेल्या स्लीप एपनियाचा परिणाम दिवसा थकवा येतो, ज्यामुळे लक्ष बिघडू शकते किंवा तुम्हाला चुकून झोप येऊ शकते, ज्यामुळे कामावर किंवा कार अपघात सारखे अपघात होऊ शकतात. आपल्याला जर स्लीप एपनियाची लक्षणे जाणवत असतील, तर आपल्या डॉक्टरांशी बोला. डॉक्टर तुमची स्लीपिंग पॅटर्न तापासतील. त्याचबरोबर झोपेच्या दरम्यान ऑक्सिजन तपासणी म्हणजेच सीपीएसी थेरपी दिली जाते असे डॉ. श्रुती शर्मा, ईएनटी तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा, मुंबई यांनी स्पष्ट केले.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel