Bottle Gourd Halwa Recipe: देशभरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला घरोघरी घट स्थापन करून ९ दिवस मातेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते. यावेळी नऊ दिवस आई भवानीला प्रसाद म्हणून विविध वस्तू अर्पण केल्या जातात. जर तुम्हालाही आईला प्रसन्न करण्यासाठी प्रसादासाठी बाजारातील मिठाईऐवजी घरीच मिठाई तयार करायची असेल तर तुम्ही दुधी हलव्याची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच, पण बनवायलाही खूप कमी वेळ लागतो. या हलव्याची विशेषता म्हणजे याची चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. ही डेझर्ट रेसिपी तुम्ही नवरात्रीनंतरही लंच किंवा डिनरसोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग वाट कसली पाहता जाणून घ्या कसा बनवायचा दुधी हलवा
- २ कप किसलेला दुधी भोपळा
- १ कप साखर (चवीनुसार)
- १/२ कप किसलेला नारळ
- १/४ कप तूप
- १ कप दूध
- १/२ चमचा वेलची पावडर
- सजावटीसाठी चिरलेले ड्राय फ्रूट्स
दुधी हलवा बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात किसलेले दुधी भोपळा घालून चांगले परतून घ्यावे. दुधी भोपळा एवढे भाजा की त्याचा सर्व कच्चेपणा दूर होईल. दुधी शिजल्यावर व मऊ झाल्यावर त्यात किसलेला नारळ व साखर घालून मिश्रण अधूनमधून ढवळून शिजवावे. आता त्यात दूध आणि वेलची पावडर घालून मिक्स करा. जेव्हा आपल्याला असे वाटेल की दुधीने सर्व दूध शोषले आहे, तेव्हा गॅस बंद करा. नंतर तुमच्या आवडत्या ड्रायफ्रूट्सने सजवा. नवरात्रीत माता दुर्गाला अर्पण करण्यासाठी तुमचा दुधी हलव्याचा प्रसाद तयार आहे.