Importance of sports for children: निरोगी राहण्यासाठी, सर्व लोकांना शारीरिक सक्रियता वाढविण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे अनेक रोग होण्याचा धोका कमी होतो. आज 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी हॉकीचे जादूगार म्हटले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवसदेखील आहे. खेळ आपल्याला केवळ तंदुरुस्त राहण्यातच मदत करत नाहीत तर, अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आपले संरक्षण करण्यासही मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, जे लोक त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये खेळ आणि व्यायाम समाविष्ट करतात त्यांना इतर लोकांच्या तुलनेत अनेक रोगांचा धोका कमी असतो.
प्रत्येकाने आपल्या मुलांना लहानपणापासूनच खेळ खेळण्याची सवय लावावी, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, शरीराच्या स्नायूंचा व्यायाम करणाऱ्या कोणत्याही खेळाचा समावेश दैनंदिन दिनक्रमात करायला हवा. त्यासाठी क्रिकेट, टेनिस, धावणे, हॉकी, फुटबॉल आदी खेळांना जीवनशैलीचा भाग बनवता येईल. खासकरून मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होण्यास मदत होते आणि आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांपासून त्यांचे संरक्षण होते. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांसाठी नियमित मैदानी खेळ का आवश्यक आहेत, यामुळे शरीराला कोणते फायदे होतात?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलसारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्या मुलांमध्ये कालांतराने वाढत आहेत. या बैठ्या जीवनशैलीसाठी म्हणजे शारीरिक निष्क्रियता हे मुख्य कारण म्हणून पाहिले जात आहे. या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करणे फायदेशीर ठरू शकते. मैदानी खेळ शरीराला व्यायाम देतात ज्यामुळे रोगांचा धोका कमी होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की जी मुले घरामध्ये वेळ घालवतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
आपल्या मुलांमध्ये मैदानी खेळांची सवय त्यांचा सर्वांगीण विकास आणि उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाने मोबाईल, टीव्ही किंवा इतर गॅझेट्समध्ये वेळ न घालवता मैदानी खेळ खेळले पाहिजेत.
-मैदानी खेळ हाडे, स्नायू आणि निरोगी शारीरिक विकासासाठी उपयुक्त.
-उत्तम शारीरिक समन्वय आणि संतुलन विकसित करण्यासाठी खेळ आवश्यक आहेत.
-खेळामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
-कार्डिओव्हस्कुलर फिटनेस वाढवण्यासाठीदेखील खेळ उपयुक्त आहेत.
-चांगली झोप, मानसिक आरोग्य लाभ आणि आत्मविश्वास वाढवण्यात खेळांचीही विशेष भूमिका मानली जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)