भारतासारख्या देशात आजही कुपोषण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. कुपोषणामुळे बालकांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटला असून ते विविध आजारांना बळी पडू शकतात. पोषणाची योग्य पातळी राखणे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यामुळेच लोकांमध्ये योग्य आहाराबाबत जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय पोषण सप्ताहा'चे आयोजन केले जाते. प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे, यासाठी या सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना संतुलित आहाराचे महत्त्व आणि योग्य पोषणाची माहिती दिली जाते. हा एक अत्यंत फायदेशीर उपक्रम आहे.
पोषणाची गरज ओळखून भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू केला आहे. राष्ट्रीय पोषण सप्ताह ही भारत सरकारची एक मोहीम आहे, ज्याचा उद्देश लोकांना योग्य आहाराचे महत्त्व समजावे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात पौष्टिक समृध्द अन्न समाविष्ट करावे हे सुनिश्चित करणे हा आहे. राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहच्या निमित्ताने आपण आज अशा ७ पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जिच्या सहाय्याने तुमच्या शरीराला संपूर्ण पोषण मिळेल.
दरवर्षी, राष्ट्रीय पोषण सप्ताहासाठी एक विशिष्ट थीम सेट केली जाते. जी संपूर्ण आठवड्यात होणाऱ्या क्रियांसाठी आणि कार्यक्रमांसाठी टोन सेट करते. २०२४ मधील राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम आहे, "सर्वांसाठी पौष्टिक आहार". या थीमनुसार हा सप्ताह साजरा केला जात आहे. यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जात आहे. तसेच नॅशनल न्यूट्रिशन वीकपासून तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहून तुमच्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांचे नियमित सेवन केल्याने आरोग्यासाठी बरेच फायदे मिळू शकतात. आज पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने आपण आहारातील सर्वात पौष्टिक पदार्थ कोणते याबाबत जाणून घेणार आहोत.
आहार तज्ज्ञांच्या मते, बदाम,आक्रोड आणि काजू यांसारखे नट हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स आणि मिनरल्सचा चांगला स्रोत आहेत. ज्यामध्ये बदाम हे व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी हे विशेषतः फायदेशीर मानले जाते. त्यामुळे दररोजच्या आहारात नट्स समाविष्ट करणे अत्यंत फायदेशीर आहे.
मूग डाळ ही प्रथिने, फायबर आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. हे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. मूग डाळीचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहे.
आहार तज्ज्ञांच्या मते, मेथी, पालक, सरसोचा साग इत्यादी हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या भाज्या लोहाचा चांगला स्त्रोत आहेत. जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने ते कॅन्सरसारख्या घातक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असल्याने ते डोळे आणि हाडांसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पालेभाज्या खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
आयुर्वेदानुसार, दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रथिने असतात. दह्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस्ट्रिक समस्या टाळतात. दही रोगप्रतिकारकशक्ती देखील मजबूत करते आणि संक्रमणांपासून संरक्षण करते. याशिवाय, ते हाडे मजबूत करते आणि ऑस्टियोपोरोसिस प्रतिबंधित करते. त्यामुळे जेवताना दही सेवन करणे उपयुक्त ठरते.
सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात आणि त्यात लोह, कॅल्शियम आणि फायबरदेखील भरपूर असतात. सोयाबीनचे सेवन हाडे मजबूत करण्यासाठी, स्नायूंच्या विकासासाठी आणि स्त्रियांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे अनेक आपल्या आहारात सोयाबीन आवर्जून समाविष्ट करतात.
ओट्स हे एक संपूर्ण पोषण आहे ज्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, लोह आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे असतात. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ओट्सच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासोबत पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. ओट्सच्या नियमित सेवनाने वजन नियंत्रणात राहते आणि रक्तातील साखरेची पातळीही स्थिर राहते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या