National Heat Awareness Day Important Things: देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट ही अलीकडच्या काळातील सर्वात गंभीर समस्या आहे. कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. उष्णतेशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी अनेकांना त्रास होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे उष्माघातही होऊ शकतो. मात्र, उष्णता टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी कशी घ्यायची हे आपण जाणून घेतले तर असे आजार टाळता येतात. उष्णतेशी संबंधित आरोग्याचे धोके आणि आजारी पडण्यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय उष्णता जागरूकता दिवस (national heat awareness day) साजरा केला जातो. हा महत्वाचा दिवस साजरा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी नॅशनल हीट अवेअरनेस डे साजरा केला जातो. यावर्षी ३१ मे रोजी हा दिवस साजरा केला जात आहे.
अमेरिकन फेडरल सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या 'ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थ एडमिनिस्ट्रेशन' (कामगार सुरक्षा आणि आरोग्य प्रशासन) आणि 'नॅशनल वेदर सर्व्हिस' (राष्ट्रीय हवामान सेवा) या संस्थांनी मिळून बाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या कल्याणाविषयी जनजागृती करण्यासाठी नॅशनल हीट अवेअरनेस डे हा दिवस सुरू केला. उन्हाळ्यात जे लोक घराबाहेर काम करतात त्यांना प्रचंड उष्णतेमुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. राष्ट्रीय उष्णता जागृती दिनाच्या पहिल्या उत्सवाची कोणतीही नोंद नाही. तथापि, दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जातो.
उष्णतेची लाट हे सर्वात धोकादायक निसर्ग संकटांपैकी एक आहे. परंतु, त्यामुळे होणारे मृत्यू आणि आजार इतके लगेच लक्षात येत नाहीत. त्यामुळे ते टाळण्यासाठी खबरदारी कशी घ्यावी याबद्दल लोकांना माहिती नसते. उष्णतेच्या लाटेमुळे लोक आजारी पडू शकतात किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकतो. विशेषत: उन्हाळ्यात घराबाहेर काम करणाऱ्यांनी या काळात सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. वर्षाच्या या काळात लोकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी नॅशनल हीट अवेअरनेस डे साजरा केला जातो.