National Handloom Day History and Significance: देशभरातील हातमाग विणकरांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कारागिरी साजरी करण्यासाठी भारतात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. हातमाग क्षेत्राबद्दल आणि भारताच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. हा विशेष प्रसंग हातमाग उद्योगाचे आपल्या इतिहासातील महत्त्व अधोरेखित करतो आणि त्यात काम करणाऱ्यांना अधिक महत्त्व देतो. या क्षेत्रातील विणकरांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना पाठिंबा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची हा दिवस महत्त्वाची संधी आहे. या दिवसानिमित्त इतिहास आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घ्या.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक घटक म्हणून ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू झालेली स्वदेशी चळवळ हातमाग उद्योगासाठी महत्त्वाची होती. आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढविणे हे चळवळीचे उद्दिष्ट होते. या उपक्रमामुळे जवळपास प्रत्येक घरात खादी बनवायला सुरुवात झाली.
इंडिया गेटजवळील प्रिन्सेस पार्कमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ खादीनिर्मित भारतीय ध्वज फडकावला. स्वदेशी चळवळीची स्थापना ७ ऑगस्ट रोजी झाली, म्हणूनच तो दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून ओळखला जातो. पहिला राष्ट्रीय हातमाग दिन भारत सरकारने ७ ऑगस्ट २०१५ रोजी चेन्नई येथे सुरू केला आणि साजरा केला.
हातमाग-विणकाम समुदायाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि आपल्या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या क्षेत्राचे योगदान अधोरेखित करण्यासाठी या दिवसाला खूप महत्त्व आहे. हातमाग उद्योग हा देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करणारा आणि राष्ट्राच्या उत्पन्नाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. हातमाग विणकर आणि संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक असल्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उद्योग आवश्यक आहे. या दिवशी हातमाग विणकरांच्या समुदायाची दखल घेतली जाते आणि या देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत त्यांच्या योगदानावर भर दिला जातो. हातमागाचा वारसा जपण्यासाठी आणि हातमाग विणकर व कर्मचाऱ्यांना अधिक संधी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे हे अधोरेखित करते.