National Cancer Awareness Day 2024: कर्करोग ही जगभरात झपाट्याने वाढणारी समस्या आहे. कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यापैकी बरेच कर्करोग टाळता येण्यासारखे आहेत. यासाठी लहानपणापासूनच सतत प्रयत्न करावे लागतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यांच्या कुटुंबात आधीच कॅन्सर आहे अशा लोकांनी आणखी सजग व्हायला हवे. कर्करोग प्रतिबंध, लवकर ओळख आणि उपचार याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस' साजरा करतो. २०१४ मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची सुरुवात केली होती.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपल्या दैनंदिन जीवनात आणि खाण्याच्या सवयींमध्ये अनेक चुकीच्या सवयी आहेत. ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. प्रत्येकाला याबाबत जागरूक केले तर कर्करोगापासून बचाव करणे सोपे होऊ शकते. कर्करोगासाठी कोणती कारणे जबाबदार मानली जातात ते आज आपण जाणून घेणार आहोत.
आपण आपली जीवनशैली सुधारली तरी कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. असे कर्करोग तज्ञांचे म्हणणे आहे. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की वाढत्या वयानुसार कर्करोगाचा धोका वाढतो, पण लहान मुलेदेखील त्याचा बळी होऊ शकतात. याशिवाय, धूम्रपान, जास्त वजन, आहारातील व्यत्यय, शारीरिक निष्क्रियता यासारख्या जीवनशैलीतील घटकदेखील कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
धूम्रपान हे कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते. आणि ८० ते ९० टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या मृत्यूसाठी ते जबाबदार आहे. तंबाखूच्या धुरात कार्सिनोजेन्स असतात जे पेशींमधील डीएनए खराब करतात. ज्यामुळे उत्परिवर्तन आणि अनियंत्रित पेशींची वाढ होते. त्याचप्रमाणे, अल्कोहोलचे जास्त किंवा नियमित सेवन केल्याने यकृत, अन्ननलिका आणि कोलोरेक्टल कर्करोगासह विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
काही प्रकारच्या आहारामुळे कर्करोगाचा धोका वाढतो असेही आढळून आले आहे. विशेषत: लाल आणि प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढू शकतो. या मांसामध्ये नायट्रेट्ससारखी कार्सिनोजेनिक संयुगे असतात. ज्यामुळे आतड्याच्या अस्तरांना नुकसान होऊ शकते.काही अभ्यासांमध्ये जास्त चरबीयुक्त आहार हानीकारक असल्याचे देखील दिसून आले आहे. त्याचप्रमाणे, साखरेचे प्रमाण जास्त असलेले आहार शरीरात जळजळ वाढवू शकते ज्यामुळे कर्करोगासह अनेक रोग होऊ शकतात.
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे सर्वात महत्त्वाचे आहे. जे लोक व्यायाम करत नाहीत किंवा शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत त्यांच्यामध्ये कर्करोगाचा धोका देखील वाढताना दिसत आहे. शारीरिक निष्क्रियतेमुळे वजन वाढू शकते. अभ्यासाने जास्त वजन किंवा लठ्ठपणाचा कर्करोगाच्या जोखमीशी संबंध जोडला आहे.