Symptoms of Anemia: दरवर्षी २१ मार्च हा दिवस राष्ट्रीय ॲनिमिया दिवस (National Anemia Day) म्हणून साजरा केला जातो. या आजाराची माहिती जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचावी, जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. ॲनिमिया म्हणजेच रक्तशय हा प्रामुख्याने लहान मुले व महिला यांच्यामध्ये आढळणारा आजार आहे. पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे होण्याऱ्या आजारामध्ये सर्वात जास्त प्रमाण रक्तशयाचे आहे. २०१९ - २१ च्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ५ च्या अहवालानुसार भारतीयामध्ये रक्तशयाचे प्रमाण खूप आहे. ६-५९ महिने या वयोगटामध्ये ६७% मुलाना ॲनिमिया झाला आहे. महिलांमध्ये याचे प्रमाण ५७% आहे. आकडेवारीनुसार निम्म्याहून अधिक लोक ॲनिमियाग्रस्त आहेत.
ॲनिमियाचे भारतातील प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. २००५ ते २०१५ या कालावधीत ॲनिमियाचे प्रमाण थोडे कमी झाले होते. परंतु रुग्ण संख्या परत वाढू लागली, त्यामुळे २०१८ साली भारत सरकारने (Government of India's Ministry of Health and Family Welfare (MoHFW) ॲनिमियामुक्त भारत हा उपक्रम सुरु केला. १९७० साली The National Nutritional Anaemia Prophylaxis Programme (NNAPP) सुरु केला होता. त्यानुसार उपाययोजना सुरु होती तरीही हा आजार आटोक्यात आला नाही. याचे नाव बदलून ॲनिमियामुक्त भारत हि योजना सुरु केली. या वरूनच लक्षात येईल कि किती वर्षे आपण या आजारावर काम करत आहोत. ॲनिमियाची भारतातील रुग्णसंख्या, रोगाची व्याप्ती, त्याबद्दल सामान्य जनतेत असणारे अज्ञान पाहता या विषयी काम करण्याचे सेवा आरोग्य फाउंडेशनने ठरविले. ही संस्था २०१६ पासून पुणे शहरातील वस्ती विभागात आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वावलंबन या विषयावर काम करत आहे. आरोग्यवर्धन, समृद्धी वर्ग, घे भरारी असे उपक्रम बावधन, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, उत्तमनगर, शिवने, सिंहगड रस्ता या भागातील वस्त्यांमध्ये सुरु आहेत. वंचित समाजातील कुटुंबाचे आरोग्य सुधारणे हे ह्या प्रकल्पाचे ध्येय आहे. वार्षिक शिबिरामधून रक्तशय तपासणी केली जाते. आतापर्यंत २५७७ ॲनिमिया रुग्णावर उपचार केले आहेत. यापैकी ४८% महिलांच्या हिमोग्लोबिनमध्ये सुधारणा झाली आहे.
रक्तामध्ये पांढऱ्या पेशी, लाल पेशी असतात. लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिन असते. ॲनिमिया म्हणजे रक्त कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे. शरीराच्या दैनदिन कामाकरिता ऑक्सिजनची गरज असते व याचा पुरवठा हा रक्ताद्वारे केला जातो. याची दैनंदिन आवश्यकता हि वय, लिंग, गर्भधारणा, इतर आजारपण या नुसार ठरते. यासाठीच शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे. हिमोग्लोबिनचे कार्य योग्य होण्यासठी लोहाची गरज असते. मात्र काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला ॲनिमिया होण्याची शक्यता असते. सकस आहाराची, लोहयुक्त आहाराची कमतरता, मासिक पाळीतील किवा इतर कारणामुळे झालेला रक्तस्राव, मुळव्याध, इतर काही आजार, जंत ही साधारणपणे आढळणारी ॲनिमियाची कारणे आहेत. शरीरात जर रक्त कमी असेल तर पर्यायाने प्राणवायू कमी असतो. त्यामुळे अशक्तपणा, थकवा, त्वचा निस्तेज होणे, चक्कर येणे, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. लहान मुलांच्या वाढीस पुरेसे पोषण मिळत नाही त्यामुळे शारीरिक वाढ कमी होते. स्मरणशक्ती कमी होते व त्याचा परिणाम अभ्यासावर दिसून येतो. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. त्यामुळे अनेक आजाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ॲनिमियाचे बरेच प्रकार आहेत. ॲनिमियावर उपचार हा त्याच्या होण्यामागे जे कारण आहे त्यानुसार ठरतो. साधारणतः सकस, लोहयुक्त आहाराची कमतरता हे कारण असते. आहारात पालेभाज्या, फळे, खजूर, मनुका, अंजीर, दुग्धजन्य पदार्थ व अंडी यांचा समावेश करावा. आहार व औषधे यातून मिळणाऱ्या लोहाचे शोषण करण्यास लिंबूवर्गीय फळे मदत करतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)