Nagasaki Day 2024: नागासाकी स्फोटामुळे वाढलेले ल्युकेमियाचे प्रमाण! आजही ठरतोय कॅन्सरला कारणीभूत-nagasaki day 2024 the incidence of leukemia leading to cancer increased after the nagasaki attacks ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Nagasaki Day 2024: नागासाकी स्फोटामुळे वाढलेले ल्युकेमियाचे प्रमाण! आजही ठरतोय कॅन्सरला कारणीभूत

Nagasaki Day 2024: नागासाकी स्फोटामुळे वाढलेले ल्युकेमियाचे प्रमाण! आजही ठरतोय कॅन्सरला कारणीभूत

Aug 08, 2024 04:13 PM IST

Nagasaki Day 2024: नागासाकी हल्ल्यातून बचावलेल्या अनेकांना रेडिएशनमुळे ल्युकेमिया, कर्करोग, अपंगत्व, थायरॉईड, श्वसनाचे विकार किंवा इतर भयंकर दुष्परिणाम झाले होते.

Nagasaki Day 2024
Nagasaki Day 2024

Nagasaki Day 2024: जगातील सर्वात मोठ्या शोकांतिकांबाबत सांगायचं झालं तर, त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या हिरोशिमा आणि नागासाकीवरीलअणुबॉम्ब हल्ल्याचा आवर्जून समावेश होतो. ६ ऑगस्ट १९४५ रोजी हा भयानक हल्ला झाला होता. या हल्ल्यात हिरोशिमामध्ये अंदाजे १४०,००० लोक मरण पावले होते. तर दुसरीकडे नागासाकीमध्ये ७४,००० लोक मरण पावले होते. या घटनेचे परिणाम इतक्या वर्षानंतर आजही तेथील स्थानिक लोकांमध्ये झालेले दिसून येतात. या हल्ल्यातून बचावलेल्या अनेकांना रेडिएशनमुळे ल्युकेमिया, कर्करोग, अपंगत्व, थायरॉईड, श्वसनाचे विकार किंवा इतर भयंकर दुष्परिणाम झाले होते.

'नागासाकी डे'चे महत्व-

दुसऱ्या महायुध्दादरम्यान जपानने लवकर माघार घ्यावी आणि अमेरिकेतील लोकांचा बचाव व्हावा, या कारणाने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अमानुष बॉम्ब हल्ला केला होता. या हल्ल्यात लाखो लोक मारले गेले होते. शिवाय त्यातून बचावलेल्या लोकांना अपंगत्व आले होते. तसेच अनेक भयानक आजारही झाले होते. अशात ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर झालेल्या हल्ल्याच्या निषदार्थात आणि जीव गमावलेल्या निष्पाप लोकांच्या स्मरणात 'नागासाकी दिवस' साजरा केला जातो. नागासाकी हल्ल्यानंतर तेथील लोकांमध्ये वाढलेल्या ल्युकेमियाचे परिणाम आपण आज पाहणार आहोत.

ल्युकेमिया म्हणजे काय?

ल्युकेमिया हा कर्करोगाचाच एक गट आहे जो थेट रक्तावर परिणाम करतो. त्यांची निर्मिती अस्थिमज्जामध्ये सुरू होते. अस्थिमज्जामध्ये आत खोलात एक मऊ असा भाग असतो. जिथे रक्त पेशी तयार होतात. परंतु जेव्हा या भागातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा त्याला रक्ताचा कर्करोग म्हणतात. हिरोशिमा-नागासाकी हल्ल्यानंतर त्यातून बचावलेल्या लोकांमध्ये ५-६ वर्षानंतर ल्युकेमियाचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर त्यांच्यामध्ये कॅन्सरसारखे भयानक आजार उद्भवले होते. आजही लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनमध्येच ल्युकेमियाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ल्युकेमियाचे लक्षण-

तज्ज्ञांच्या मते ल्युकेमियाचा धोका लहान मुलांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. अशा स्थितीत त्याच्या लक्षणांबाबत सांगायचे झाले, तर तज्ज्ञ म्हणतात की, सतत ताप येणे, थकवा जाणवणे, रक्तप्रवाह होणे,छोट्या-छोट्या गोष्टीमुळे लगेच रक्त येणे, अचानक कारण नसताना वजन वेगाने घटने, हाडे प्रचंड दुखणे असे वारंवार घडत असेल. तर डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

ल्युकेमियाचा सर्वाधिक धोका कुणाला?

ल्युकेमियालाच ब्लड कॅन्सर म्हणून संबोधले जाते. हा एक अस्थिमज्जामध्ये होणारा कर्करोग आहे. काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी तब्बल १२ हजारच्या जवळपास मुले ल्युकेमियाने ग्रस्त होतात. अस्थिमज्जाच्या अयोग्य कार्यामुळे ल्युकेमिया होतो. ज्याठिकाणी रक्त पेशी तयार होतात, त्याठिकाणीच या कॅन्सरच्या पेशी उद्भवतात. जेव्हा या भागातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा त्याला रक्ताचा कर्करोग म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, मोठ्यां पेक्षा लहान वयातील मुलांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)