Nag Panchami 2024 Recipes: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात एखादा तरी सण साजरा केलाच जातो. वर्षातील प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. नुकतंच श्रावण महिना सुरु झाला आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रावणात विविध सण साजरे केले जातात. यातील पहिला सण असतो नागपंचमी. आज देशभरात नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. नागदेवाची पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात येतो. अशातच प्रत्येक राज्यात नागदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनतात. आज आपण जाणून घेणार आहोत कि महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात काय बनते.
प्रत्येक सणाला प्रत्येक राज्यात वेगळे नियम आणि वेगळ्या मान्यता असतात. त्यानुसार महाराष्ट्रात नागपंचमीला कढई किंवा तव्याचा वापर टाळणे. शिवाय भाजणीचे पदार्थ न बनवणे अशा मान्यता आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नागपंचमीला गव्हाचीखीर हा मुख्य पदार्थ असतो. शिवाय यादिवशी खासकरून उकडीचे पदार्थ केले जातात. यामध्ये उकडीचे कानवले, पुरणाचे दिंड या पारंपरिक पदार्थांचा समावेश होतो. शिवाय कोकणसारख्या भागात पाटवड्या केल्या जातात.
राजस्थान हे राज्यसुद्धा विविध खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. याठिकाणी अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. राजस्थानमध्येसुद्धा नागपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. नागदेवाला प्रसन्न करण्यासाठी या राज्यात तेथील पारंपरिक पदार्थ असणारा दाल बाटी चुरमा बनवला जातो. हा पदार्थ तुरीच्या डाळीपासून बनतो. विशेष म्हणजे दाल बाटी चुरमा जगभरात प्रसिद्ध आहे.
श्रावणात येणारा पहिला सण नागपंचमी बिहार आणि उत्तर प्रदेशातसुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. याठिकाणीसुद्धा नागदेवाची पूजा करून पारंपरिक नैवेद्य देवाला चढवला जातो. भाजणी, कापणीचे पदार्थ न करता येत असल्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पारंपरिक मालपुआ बनवला जातो. हा गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केला जातो. आपल्या देशातील महत्वाच्या मिठाईच्या पदार्थांमध्ये मालपुआचा समावेश होतो.
देशातील इतर राज्यांप्रमाणे मध्य प्रदेशात देखील नागपंचमीचा सण अत्यंत उत्साहात साजरा होतो. या राज्यात नागपंचमीला नैवेद्य म्हणून तेथील पुरी आणि खीर हा पारंपरिक पदार्थ अर्पण केला जातो. याठिकाणी तांदळापासून खीर बनवण्यात येते. तर दुसरीकडे गव्हापासून पुऱ्या बनवल्या जातात. अशाप्रकारे महाराष्ट्रासह विविध राज्यात विविध नैवेद्याचे पदार्थ बनवले जातात.