Nag Panchami 2024: हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना अत्यंत खास असतो. या महिन्यात भगवान शिवच्या श्रद्धेत पूजा आणि उपवास तर होतातच, शिवाय या महिन्यात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे 'नागपंचमी' होय. श्रावण मासातील शुक्ल पंचमीच्या दिवशी नागपंचमी साजरी करण्यात येते. यादिवशी नागदेवाची पूजा केली जाते. इतकेच नव्हे तर यादिवशी विविध पारंपरिक पदार्थसुद्धा केले जातात. तुम्हालासुद्धा यंदाच्या नागपंचमीला निवदासाठी पारंपरिक पदार्थ बनवण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. आज आम्ही तुम्हाला पारंपरिक 'पुरणाचे दिंड' कसे करतात ते सांगणार आहोत. ही सोपी रेसिपी तुमचा नागपंचमीचा सण आणखीनच गोड करेल यात काही शंका नाही.
– चण्याची डाळ (दोन वाट्या)
– गूळ (दोन वाट्या)
– हळद (चिमूटभर)
– तूप (आवडीनुसार)
– वेलची पूड (आवडीनुसार)
– जायफळची पावडर
– एक कप गव्हाचे पीठ
– मीठ (चवीनुसार)
–पाणी २-३ वाट्या
– तेल (दोन ते तीन चमचे )
सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ घेऊन ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर एका भांड्यात रात्रभर भिजत ठेवावी. यासाठी किमान ६ ते ८ तास डाळ भिजणे आवश्यक आहे. त्यांनंतर सकाळी डाळ शिजवताना प्रमाणानुसार घेतलेली डाळ कुकरमध्ये घालून, त्यात पाणी आणि थोडे तेल टाकून ३ ते ५ शिट्ट्या देऊन घ्याव्या. डाळ शिजवताना त्यामध्ये चिमूटभर हळदसुद्धा टाकावी त्याने पुरणाच्या दिंडला रंग खूप छान येतो. डाळ शिजली कि त्याचे पाणी घालून वेगळे करावे. हेच पाणी आपण पुढे आमटीसाठी वापरणार आहोत.
शिजलेली डाळ एका भांड्याच्या मदतीने चांगली बारीक करून घ्यावी. डाळ पूर्णपणे स्मॅश झाल्यानंतर एका कढईत घेऊन त्यात घेतलेले गूळ घालून पुन्हा शिजत ठेवावी. शिजत असताना गुळाला पाणी सुटते. हे पाणी चांगले आटू पर्यंत डाळ शिजू द्यावी. पाणी नाहीसे झाल्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. पूर्ण शिजवताना ते तळाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून मिक्स करून घ्यावे.
गव्हाच्या पिठात आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, तेल टाकून ते हलक्या हाताने चांगले मळून घ्यावे. आता या कणकेचे लहान-लहान गोळे करून ते पुऱ्यासारखे अलगद लाटून घ्यावे. त्या लाटलेल्या पाऱ्यांमध्ये पुरणाचे तयार मिश्रण घालून चारही बाजूने ते चांगले बंद करून घ्यावे. आता गॅस किंवा चुलीवर एका भांड्यात पाणी उकळायला ठेऊन त्याला चांगली वाफ काढून घ्यावी. यासाठी तुम्ही स्टीमरचादेखील वापर करू शकता. स्टीमर नसेल तर एका भांड्यात पाणी घालून त्यात एक चाळण ठेऊन त्यावर सुती कापड अथवा केळीचे पान ठेऊन, सुमारे १० ते १५ मिनिटे त्याला वाफ काढून घ्यावी. त्यांनंतर डाळीच्या पाण्यापासून झणझणीत आमटी बनवून हे पुरणाचे दिंड खाण्यासाठी वाढावे.