Changes in Diet Before Marathon: मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी धावपटूंना कित्येक दिवसांपासून तयारी करावी लागते. योग्य व्यायामाबरोबरच संतुलित आहार हा स्नायूंना बळकटी आणण्याचे काम करतो. कर्बोदक, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स यांचे सेवन केल्याने शरीरातील उर्जा वाढते. पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीस मदत करते. भरपुर पाणी पिणे तसेच फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांद्वारे विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. आजारपणाचा धोका कमी होतो. २१ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असाल तर आहारात काय बदल करावे, आहार कसा असावा याबाबत झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल येथील आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी माहिती दिली.
मॅरेथॉनपटू अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना तोंड देत आपले शरीर शर्यतीसाठी तयार करतात आणि त्यांच्या यशासाठी योग्य पोषण अत्यंत महत्त्वाचे असते. संतुलित आहार ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे, ते मॅरेथॅान शर्यत पूर्ण करण्यात मदत करतात. तृणधान्य, फळे आणि भाज्या यासारखा कर्बोदकयुक्त आहार शरीरात ऊर्जा निर्माण करतात. तर चिकन, मासे आणि टोफू यांसारखी प्रथिने स्नायूंची दुरुस्ती आणि पुनर्प्राप्तीस मदत करतात. एव्होकॅडो, ड्राय फ्रूट्स आणि तेलबिया यांसारख्या स्त्रोतांमधे आढळणारे हेल्दी फॅट्स हे ४२ किमीच्या मॅरेथॅानमध्ये धावण्यास अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतात.
मॅरेथॉन धावपटूंनी त्यांच्या शर्यतींपूर्वी, दरम्यान आणि नंतर हायड्रेटेड राहणे अतिशय गरजेचे आहे. डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. इलेक्ट्रोलाइट युक्त ड्रिक्स किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स हे लांब पल्ल्याच्या मॅरेथॅान गाठल्यानंतर घामावाटे गमावलेले सोडियम भरून काढण्यास मदत करतात. एकूणच मॅरेथॉन धावपटूंना शर्यतीच्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
मॅरेथॉन धावपटूंनी पचण्यास जड तसेच स्निग्ध पदार्थांपासून दूर राहावे. ज्यामुळे शर्यतीदरम्यान पोटासंबंधीत त्रास टाळता येऊ शकतो. तळलेले पदार्थ, चरबीयुक्त मांस आणि क्रीम, सॉस हे सर्व पदार्थ पचनक्रिया मंद करू शकतात आणि लांब अंतरावर धावताना क्रॅम्पिंग किंवा मळमळ होण्याचा धोका वाढवू शकतात. बीन्स, डाळी आणि संपूर्ण धान्य यांसारखे उच्च फायबर असलेले पदार्थ काही खेळाडूंसाठी पौष्टिक ठरु शकतात. परंतु ते शर्यतीदरम्यान धावपटूंमध्ये सूज आणि अस्वस्थता आणू शकतात.
मॅरेथॉन धावपटूंनी अति आम्लयुक्त किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन सावधगिरीने केले पाहिजे. हे पोटाच्या आतड्यांसाठी त्रासदायक ठरु शकतात. लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो आणि मिरपूड शारीरिक हालचालींदरम्यान काही व्यक्तींमध्ये छातीत जळजळ किंवा अॅसिड रिफ्लक्स सारखी समस्या निर्माण करू शकतात. केळी, तांदळाचे डोसे किंवा व्हाईट ब्रेड यांसारखे पर्याय निवडल्याने शर्यतीच्या दिवशी अनावश्यक पचन समस्या निर्माण न करता ऊर्जा पातळी राखण्यात मदत होऊ शकते. मॅरेथॉनपर्यंत आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास धावपटू आपली शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करु शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)