Tips for Marathon: टाटा मुंबई मॅरेथॉन अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. मॅरेथॉनमध्ये धावल्याने निश्चितच एक समाधान मिळत असते. पण ही मॅरेथॉन धावण्याआधी योग्य तयारी करणे सुद्धा तितकेच आवश्यक असते. त्याच बरोबर आपल्या शरीरात पाण्याच्या पातळीचा समतोल राखणे ही अत्यंत आवश्यक असते. मुंबईतील एशिअन हार्ट इन्स्टिट्यूटचे क्रिटिकल केयर एंड ग्रुप मेडिकल डायरेक्टर व टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ चे मेडिकल डायरेक्टर डॉ. विजय डी'सिल्वा यांनी हायड्रेशनबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
मानवी शरीरात ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी असते. जेव्हा तुम्ही मॅरेथॉनमध्ये धावता तेव्हा जो घाम येतो त्यामुळे हायड्रेशन कमी होते म्हणजेच डिहायड्रेशन होते. तुमचं वजन किती आहे, बाहेरचं वातावरण कसं आहे, कितपत उष्मा आहे, ह्युमिडिटी किती आहे आणि तुम्ही किती वेळ धावताय, यावरून तुम्हाला येणाऱ्या घामाचं प्रमाण कमी-जास्त असू शकतं. तुम्हाला मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी कमी वेळ लागत असेल तर डिहायड्रेशन कमी होतं आणि जास्त वेळ लागत असेल तर डिहायड्रेशन जास्त होतं. तसेच तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला घाम जास्त येतो. म्हणजे स्वेटिंग लॉस जास्त होतो आणि तुमचं वजन कमी असेल तर तुमचा स्वेटिंग लॉस कमी होतो.
सामान्यपणे व्यक्ती एका दिवसात त्याच्या शारीरिक गरजेनुसार दोन ते चार लिटर पाणी पितो. एवढे पाणी पिऊनही प्रॅक्टिस किंवा मॅरेथॉन दरम्यान जो स्वेट लॉस होतोय तोसुद्धा भरून निघणं आवश्यक असतं. मॅरेथॉन धावताना इलेक्ट्रोलाइट्सचा जो लॉस होतो, त्याबद्दल डॉ. विजय डी'सिल्वा सांगतात कि, ज्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिस करता किंवा ज्या दिवशी तुम्ही मॅरेथॉनमध्ये धावणार असाल त्या दिवशी रनिंगच्या २ तास आधी किमान अर्धा लिटर पाणी प्या आणि आणि रनिंग सुरु कररायच्या पंधरा मिनिटे आधी २०० मिलिलीटर पाणी प्या. त्यानंतर दर तासाला तुम्ही ४०० ते ८०० मिलिलीटर पाणी प्यायले पाहिजे. तुमचे धावण्याचे तास जितके वाढतात तितकं पाणी तुम्ही पिणं गरजेचं आहे.
पाणी पितानाही साधं पाणी पिऊन चालणार नाही तर इलेक्ट्रोलाइट असलेलं पाणी प्यायलं पाहिजे. तुम्ही पुरेपूर प्रमाणात पाणी प्यायला नाहीत तर डिहायड्रेशन होईल. त्यामुळे शरीरात डिस्टर्बन्स निर्माण होऊ शकतो व समस्या उद्भवू शकतात. तसेच तुम्ही खूप जास्त पाणी प्यायलं तरी त्याने समस्या त्रासदायक ठरू शकते. तुम्ही याचा बॅलेन्स साधला पाहिजे. जास्त पाणी पिणंही योग्य नाही आणि कमी पाणी पिणंही योग्य नाही. म्हणून मॅरेथॉनच्या आधी, मॅरेथॉन धावताना आणि मॅरेथॉननंतर तुमचा जो वॉटर इनटेक होतोय, त्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.
मॅरेथॉन धावण्याआधी योग्य तयारी करणे आवश्यक असते. लाँग डिस्टन्स रनिंग करताना ज्या रस्त्यावर सराव केला जातो, तो रस्ता सपाट असला पाहिजे. तो ओबडधोबड असेल किंवा उंचसखल असेल तर दुखापत होण्याची शक्यता असते. तुम्ही चढणीवर धावत असाल तर तुम्हाला अकिलिस कंडरा प्रतिक्षेप ही दुखापत होण्याची शक्यता असते. तुम्ही उतारावर धावत असाल तर तुमच्या गुडघ्याच्या लिगामेंटला आणि मेनिस्कसला दुखापत होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे पाऊल सपाट असेल किंवा पावलाला असलेला बाक हा प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मॅरेथॉन धावताना समस्या उद्भवू शकते किंवा दुखापत होऊ शकते. चुकीचे बूट वापरले तरी त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे मॅरेथॉन धावताना सुयोग्य फिटिंगचे बूट वापरणे आवश्यक असते.
या समस्यांवरील उपाय सोपे आहेत. बर्फ लावणे, पेन किलर घेणे, मसाज करणे आणि स्ट्रेचिंग करणे. यामुळे व्यक्तीला वेदनेपासून दिलासा मिळेल. पण वेदना थांबल्या नाहीत तर ऑर्थोपेडिक फिजिशिअनची भेट घ्यावी. त्याचप्रमाणे लाँग डिस्टन्स रनिंग करण्याआधी तुम्ही स्नायू स्ट्रेच केले तर त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)