How to prevent monkeypox infection: कोरोनानंतर आता जगभरात एमपॉक्स अर्थातच मंकीपॉक्स आजाराने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस या आजाराचे सावट वाढतच आहे. जगभरात या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. एमपॉक्सचा संसर्ग चिंताजनक वेगाने पसरत आहे. या आजाराने आफ्रिका आणि स्वीडनसारख्या देशांमध्ये भय पसरविले आहे. मात्र आता भारतानेही या संसर्गाबाबत सावध राहण्याची गरज आहे. कारण भारताशेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये एमपॉक्स विषाणूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार उत्तर खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी सांगितले की, पाकिस्तानमध्ये एमपॉक्स विषाणूचे तीन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यूएईहून आल्यानंतर रुग्णांमध्ये व्हायरल इन्फेक्शन आढळून आल्याचे विभागाने सांगितले आहे.
भारतातील लोक नुकतंच कोरोना महामारीतून बाहेर पडले आहेत. आणि त्याच दरम्यान जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा प्रसारही सुरू झाला आहे. जगभरात या विषाणूची लागण झालेल्या लोकांची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आता WHO ने देखील याला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. WHO ने ही आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. या समस्येबाबत सर्वांनीच सतर्क राहायला हवे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आज आम्ही तुम्हाला एमपॉक्स म्हणजे काय, त्याचा प्रसार कसा रोखायचा याबाबत सांगणार आहोत.
मंकीपॉक्स हा चेचकसारखा एक विषाणूजन्य रोग आहे. त्याचे नाव मंकीपॉक्स असले तरी त्याचा माकडांशी काहीही संबंध नाही. ही समस्या स्मॉल पॉक्स कुटुंबाशी संबंधित आहे. अहवालानुसार, मंकीपॉक्स पहिल्यांदा १९५८ मध्ये प्राण्यांमध्ये दिसून आला. त्यावेळी संशोधनास ठेवलेल्या माकडांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळून आला होता. तर काहीच वर्षांनी म्हणजेच १९७० मध्ये, कांगोमधील एका मुलामध्ये मंकीपॉक्स आढळून आला. माणसांमध्ये हा आजार आढळण्याची ही पहिलीच वेळ होती. तर, १९८० मध्ये चेचक निर्मूलनानंतर, ही एक गंभीर समस्या म्हणून उदयास आली आहे. जास्तकरून उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या जवळ ही प्रकरणे आढळतात.
मंकीपॉक्सचे विषाणू हवेत पसरत नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या पुरळमधून येणाऱ्या पाण्याशी संपर्क झाल्याने तसेच लैंगिक संबंधातून हा रोग पसरतो. याशिवाय दूषित चादर, टॉवेल आणि कपड्यांमधूनही ही समस्या पसरू शकते.
या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एमपॉक्ससारखे दिसणारे पुरळ असलेल्या लोकांजवळ जाणे टाळा. आणि संक्रमित प्राणी किंवा व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या कपडे, चादरी, ब्लँकेट किंवा इतर गोष्टींना स्पर्श करणे टाळा. आपले हात सतत साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा. हात धुण्याची सुविधा उपलब्ध नसल्यास, अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा. स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तुम्हाला लक्षणे माहित असणे आणि स्वतःची तपासणी करत राहणे महत्त्वाचे आहे.