WHO's expert opinion on monkeypox: चार-पाच वर्षांपुर्वी भारतासह जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळे लोक हादरून गेले होते. लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या सर्व समस्येतून लोक स्वतः ला आता कुठे सावरत आहेत. तोपर्यंत आता जागतिक स्थरावर आणखी एका महा भयंकर रोगाने थैमान घातले आहे. या रोगाचे नाव एमपॉक्स अर्थातच मंकीपॉक्स असे आहे. आफ्रिकन देशांमध्ये झपाट्याने पसरणारा एमपॉक्स रोग हा नवा कोरोना ठरू शकतो आणि त्यामुळे जगभरात आणखी एक लॉकडाऊन होऊ शकतो, अशी चिंता जगभरात व्यक्त केली जात आहे. कोरोनामधील लॉकडाऊनमुळे झालेल्या भयंकर त्रासांची आठवण करूनही लोकांना घाम फुटतो. त्यामुळे लोकांना एमपॉक्सबाबत काळजी वाटणे स्वाभाविक आहे.
अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे अर्थातच WHO चे तज्ज्ञ डॉ. हॅन्स क्लुगे यांनी सप्ष्टीकरण देत सांगितले आहे की, Mpox नवीन कोविड अजिबात नाही. कारण आरोग्य अधिका-यांना रोगाचा प्रसार कसा रोखायचा हे माहित आहे. एमपीओएक्सच्या नवीन प्रकारामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होऊ शकते का असे त्यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, लॉकडाऊनची अशी कोणतीही शक्यता सध्या नाही. त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
एमपॉक्सची आफ्रिकेनंतर युरोपात काही प्रकरणे आढळल्यानंतर युरोपातील लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. MPOX चे नवीन प्रकार क्लेड आयबी हे अतिशय धोकादायक असून या आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका १० ते ११ टक्के आहे. हे पाहून जगभर भीतीचे वातावरण आहे. विशेषत: युरोपमधील लोकांमध्ये, या विषयावर, डब्लूएचचे युरोपचे प्रादेशिक संचालक डॉ. हॅन्स क्लुगे म्हणाले की, विषाणूच्या नवीन प्रकाराबद्दल नक्कीच चिंता आहे, परंतु आपण एकत्रितपणे हुशारीने या रोगाचा संसर्ग थांबवू शकतो.
रिपोर्ट्सनुसार, अलिकडच्या काही महिन्यांत, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये एमपॉक्समुळे ४५० लोक मरण पावले आहेत. आणि स्वीडनमध्ये देखील असेच एक प्रकरण नोंदवले गेले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपल्याला नवीन प्रकाराबद्दल बरेच काही माहित असणे आवश्यक आहे, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की हा रोग सहजपणे पसरू शकतो आणि गंभीर होऊ शकतो.
आतापर्यंत करण्यात आलेल्या वैज्ञानिक अभ्यासानुसार, समलैंगिक पुरुषांमध्ये एमपॉक्सचा संसर्ग अधिक सामान्य आहे. याचा अर्थ पुरुषांसोबत सेक्स करणाऱ्या पुरुषांना या आजाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे काँगोमधील सेक्स वर्कर्समध्ये या आजाराची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की केवळ समलिंगी पुरुषांना हा आजार होऊ शकतो, परंतु जे लोक संक्रमित व्यक्तीच्या जवळ येतात त्यांना देखील एमपॉक्स होण्याचा धोका जास्त असतो.