Lung Cancer Causes: फुफ्फुसाचा कर्करोग हे जगातील सर्वत्र मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. भारतामध्ये ही समस्या अधिक चिंताजनक बनत आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनातून धक्कादायक तथ्य समोर आले आहेत. पारंपारिकरीत्या धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे मुख्य कारण मानले जाते. परंतु भारतात आढळणाऱ्या निम्म्याहून अधिक फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांनी कधीही धूम्रपान केलेले नाही.
या नवीन संशोधनानुसार, दक्षिणपूर्व आशियामधील फुफ्फुसाचे कॅन्सर हे इतर आशियाई देश आणि पश्चिम देशांपासून वेगळे आहे. द लँसेन्ट रिजनल हेल्थ साऊथइस्ट एशिया जर्नलमध्ये प्रकाशिक झालेल्या या संशोधनानुसार भारतात २०१९ मध्ये सुमारे १२ लाख नवीन कॅन्सरची प्रकरणे आणि ९.३ लाख मृत्यू झाल्याचे आढळले आहे. तंबाखू, धूम्रपान, पॅसिव्ह स्मोकिंग हे फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्रमुख कारणे म्हटली जातात. परंतु या नवीन संशोधनातून एक धक्कादायक तथ्य समोर आले आहे. या संशोधनानुसार, भारतातील अनेक फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांनी कधीही तंबाखू सेवन केले नाही आणि धूम्रपान केले नाही.
१९९० मध्ये प्रति लाख लोकांमागे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण ६.६२ इतके होते, जे २०१९ मध्ये वाढून ७.७ इतके झाले आहे. विशेषत: शहरी भागात २०२५ पर्यंत या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हे संशोधन भारतातील लोकांच्या जनुकीय रचनेमुळे फुफ्फुसाचे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, असे सुचवते. या संशोधनानुसार, भारतातील फुफ्फुसाच्या कॅन्सरचे रुग्ण हे पाश्चिमात्य देशांच्या रुग्णांपेक्षा साधारणपणे दहा वर्षांनी लहान असतात. विशेषत: ५४ ते ७० वर्षे वयोगटातील लोकांमध्ये हा कॅन्सर जास्त आढळतो. याचे कारण भारतातील तरुण लोकसंख्या (सरासरी वय २८.२ वर्षे) आणि अमेरिका (३८ वर्षे) आणि चीन (३९ वर्षे) यांच्या तुलनेने कमी वय असणे हे असू शकते.
याशिवाय हवेतील असलेले धूर आणि जनुकीय रचनेमुळे देखील फुफ्फुसाचे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तसेच, पुरुषांमध्ये तंबाखू अधिक प्रमाणात वापरण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरची प्रकरणे पुरुषांमध्ये जास्त आढळतात (४२.४ टक्के) तर महिलांमध्ये कमी प्रमाणात (१४.२ टक्के) आढळतात.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नवी दिल्ली येथील संशोधकांनी हवामान बदल आणि फुफ्फुसाच्या कॅन्सर यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला. त्यांना आढळले की, आशियात राष्ट्रीय आपत्तींमुळे सर्वाधिक प्रभावित होणारे चीन, भारत, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि थायलंड हेच देश २०२० मध्ये सर्वाधिक फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांनी ग्रस्त होते. या वर्षी या देशांमध्ये ९.६५ लाख नवीन रुग्ण आढळले. याचा अर्थ असा होतो, की वाढते वायु प्रदूषण हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे एक प्रमुख कारण बनत चालले आहे, अगदी धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये देखील हे पहायला मिळत आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)