Mosquito Bites Reasons: पावसाळ्याच्या दिवसात डास तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतात. मात्र, इतरांच्या तुलनेत काही लोकांना डासांमुळे अधिक त्रास होतो, अशी त्यांची तक्रार असते. काही अहवाल असे म्हणतात की, काही लोक खरोखरच डासांसाठी चुंबकासारखे काम करतात. यामागे देखील काही कारणं आहेत. इतरांपेक्षा तुम्हालाही अधिक डास चावत असतील, तर जाणून घ्या त्याची ५ कारणं…
असे मानले जाते की, ज्या लोकांच्या शरीराचे तापमान जास्त असते, अशा लोकांवर डास अनेकदा जास्त बसतात. मादी डास देखील उष्णतेकडे आकर्षित होतात आणि उष्णतेचे इतर स्त्रोत असले तरीही लोकांच्या दिशेने जाण्याचा पर्यायच ते निवडू शकतात. त्यामुळे थंड वातवरणात बाहेर गेल्यास तुम्हाला डासांच्या चाव्याला सामोरे जावे लागू शकते.
तुम्ही नक्की कधीना कधी आपल्या आई-बाबांना विचारलेच असेल की, डास मलाच जास्त का चावतात? तेव्हा तुम्हाला उत्तर मिळाले असेल की, तुझे रक्त गोड असेल. तर, ज्यांचा रक्तगट ओ आहे, त्यांच्या रक्ताकडे डास अधिक आकर्षित होतात, असे काही अहवालात म्हटले गेले आहे. अशा लोकांना डास जास्त चावतात.
शरीराची दुर्गंधी, घामाचा वास याचाही डासांवर परिणाम होतो. जर तुमची त्वचा स्वच्छ असेल तर डास कमी आकर्षित होतील. आपल्या त्वचेवर बॅक्टेरिया असल्यास डास अधिक आकर्षित होतात, असे काही अहवालात म्हटले आहे.
कार्बन डायऑक्साईडचा वासही डासांना माणसांकडे वेगाने आकर्षित करतो. मादी डास आपल्या संवेदन अवयवातून कार्बन डायऑक्साईडचा वास ओळखून मानवी शरीराकडे आकर्षित होतात. डास चावण्याचे हेही एक कारण आहे. युरीक अॅसिड, लॅक्ट अॅसिडी, अमोनियाचा वासही डासांना आकर्षित करतो, असेही काही अहवालात म्हटले आहे.
काही रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, बिअर प्यायल्यानंतर घामामध्ये इथेनॉलचा वास मिसळतो, यामुळे डास तुमच्यावर हल्ला करू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या