Spring Roll Recipe in Marathi: जर तुम्ही चायनीज फूड लव्हर असाल आणि पावसाळ्यात काहीतरी चांगलं बनवायचं असेल तर स्प्रिंग रोलची ही टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. तसं तर पावसाळ्यात बाहेरचे अन्न खाणे टाळावे असा सल्ला प्रत्येक जण देतो. अशा वेळी पावसाची मजा दुप्पट करण्यासाठी तुम्ही ही रेसिपी फॉलो करून घरीच स्प्रिंग रोल बनवू शकता. ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून देखील सर्व्ह करू शकता. जाणून घ्या स्प्रिंग रोलची रेसिपी.
- अर्धा कप मैदा
- बेकिंग पावडर
- चवीनुसार मीठ
- एक चतुर्थांश कप दूध
- तेल एक कप
- बारीक चिरलेली कोबी
- बारीक चिरलेला कांदा
- एक कप बारीक चिरलेले गाजर
- चार पाकळ्या लसूण
- एक चमचा सोया सॉस
- एक चमचा मैदा पाण्यात मिक्स केलेले
- काळी मिरी
- तळण्यासाठी तेल
सर्वप्रथम एका भांड्यात मैदा आणि बेकिंग पावडर टाकून पाणी किंवा दुधाच्या साहाय्याने मऊ पीठ मळून घ्या. यानंतर मळलेले पीठ झाकून एक तास ठेवावे. जेणेकरून ते चांगले फुलेल. आता स्प्रिंग रोल स्टफिंग तयार करण्यासाठी एका कढईत तेल गरम करून त्यात लसूण आणि चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात कोबी, गाजर घालून दोन ते तीन मिनिटे चांगले मिक्स करा. भाज्या थोड्या शिजल्यावर त्यात सोया सॉस, काळी मिरी आणि मीठ घालून शिजवा. आता हे स्टफिंग एका प्लेटमध्ये काढून घ्या.
स्प्रिंग रोलसाठी रोल तयार करण्यासाठी प्रथम मळलेल्या पीठाचे लहान गोळे तयार करा आणि त्यांना पोळीसारखे लाटून घ्या. आता ही पोळीला दोन्ही बाजूने तेल लावून कढईत सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेली पोळी कटरच्या साहाय्याने चौकोनी आकारात कापून त्यात भाज्यांचे स्टफिंग भरून घ्या. आता ही शीट गोल फोल्ड करा. दोन्ही कडांवर मैद्याचे बॅटर लावा आणि आपली स्प्रिंग रोल शीट चांगली सील करा. तळताना आतील स्टफिंग बाहेर येणार नाही म्हणून ते व्यवस्थित सील आहे याची खात्री करा. आता एका कढईत तेल गरम करून रोल नीट तळून घ्या. त्याचा रंग सोनेरी होऊ लागल्यावर तेलातून काढून टाका. तुमचे स्प्रिंग रोल तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या