Crispy Onion Pakoda Recipe: पावसाळ्यात चहाच्या कपसोबत गरमा गरम भजी, पकोडे मिळाले तर जणू संपूर्ण दिवस आल्हाददायक होतो. वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले पकोडे ही पावसाळ्याची हिट रेसिपी आहे. तुम्हालाही या पावसाळ्यात आपल्या टेस्ट बड्सला ट्रीट द्यायची असेल तर घरच्या घरी कुरकुरीत कांदी भजी बनवा. लहान मुले असोत वा मोठे, ही रेसिपी सर्वजण मोठ्या आवडीने खातात. या रेसिपीची विशेषता म्हणजे हे भजी खायली जेवढे टेस्टी आहेत तेवढेच ते बनवायला सोपे आहेत. अतिशय कमी वेळात ते तयार होतात. चला तर मग जाणून घ्या क्रिस्पी कांदा बनवण्याची रेसिपी.
- २ कप बारीक चिरलेला लाल कांदा
- १ कप बेसन
- २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- १ चमचा मीठ
- १ चमचा काश्मिरी लाल तिखट
- २ चमचे बारीक चिरलेले आले
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- २ चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची
- १/४ टीस्पून हिंग
- २ टेबलस्पून तेल
- १/८ टीस्पून हळद
- १ टीस्पून चाट मसाला
- भजी तळण्यासाठी ३-४ कप तेल
कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात कांदा, मीठ, काश्मिरी लाल तिखट, आले, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि हिंग टाकून ते सर्व बोटांच्या साहाय्याने चांगले एकत्र मिक्स करा. यानंतर भज्याचे हे मिश्रण १० मिनिटे बाजूला ठेवा. जेणेकरून या काळात कांदा थोडे पाणी सोडतो. आता भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ आणि तेल घालून सर्व काही नीट मिक्स करा. यानंतर त्यात हळद आणि २ टेबलस्पून पाणी घालून चांगले मिक्स करून भज्यासाठी घट्ट बॅटर तयार करा.
यानंतर मध्यम आचेवर कढईत भजे तळण्यासाठी तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम करून त्यात हाताने छोटे छोटे भजे टाका. हे सोनेरी तपकिरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. भजे तळताना दोन्ही बाजूंनी फिरवा जेणेकरून ते दोन्ही बाजूंनी नीट तळले जातील. भजी तळताना कढईत एका वेळी खूप जास्त भजे टाकू नका. असे केल्याने तेलाचे तापमान कमी होईल आणि भजी कुरकुरीत होणार नाहीत. आता टिश्यू पेपरवर भजी काढून वर चाट मसाला शिंपडा आणि लगेच गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या