Monsoon Hair Care Tips In Marathi: प्रखर उन्हाळ्यानंतर पावसाचा शिडकावा कितीही हवाहवासा वाटला, तरी या ऋतूमध्ये केसांची निगा राखणं अवघड असतं. प्रचंड आर्द्रता आणि अचानक येणाऱ्या पावसामुळे केस खराब होतात. या मोसमात केस फ्रीझी होतात, निस्तेज दिसायला लागतात. इतकंच नाही तर, केस चमकदार ठेवणं अवघड होतं. गोदरेज प्रोफेशनल्सचे नॅशनल टेक्निकल हेड शैलेश मुल्या यांनी केसांची कशी काळजी घ्यायची आणि संपूर्ण पावसाळ्यात केस सुंदर, निरोग कसे ठेवायचे याच्या काही महत्त्वाच्या टिप्स सगळ्यांसाठी शेअर केल्या आहेत.
पावसाळ्यात जाणवणारी प्रमुख समस्या केस फ्रीझी होणे. केसांमधली आर्द्रता वाढल्यामुळे केसांचे क्युटिकल्स फुगतात व ते फ्रीझी होतात आणि वाट्टेल तसे वळतात. शिवाय, स्कॅल्प (टाळू) तेलकट होतं आणि केसांची टोकं कोरडी पडतात. यामुळे केसांची निगा राखणं आणखी अवघड होतं. पावसाच्या पाण्यात प्रदूषक घटक असल्यामुळेही केस निस्तेज होण्याची शक्यता असते. मात्र, योग्य काळजी आणि उत्पादनांच्या मदतीने पावसाळ्यात केस निरोगी आणि सुंदर राखणं शक्य आहे.
केस कोरडे ठेवा: हा उपाय अगदी सहज करता येणारा वाटत असला, तरी तितकाच कठीणही आहे. पावसाळ्यात केस चमकदार ठेवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे ते कोरडे ठेवणे. केस ओले होऊ नयेत यासाठी, बाहेर जाताना सोबत कायम रेनकोट किंवा छत्री ठेवा. केस ओले झाल्यास ते शक्य तितक्या लवकर सौम्य शॅम्पू व कंडिशनरने धुवा आणि केसांत गेलेले प्रदूषित घटक काढून टाका.
योग्य उत्पादने वापरा: केस नियमितपणे धुवा आणि टाळू स्वच्छ, कोणत्याही संसर्गापासून मुक्त ठेवा. केसांचा पोत लक्षात घेऊन त्यानुसार खास तयार केले गेलेले शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. उदा. गोदरेज प्रोबायो पॅराबीनमुक्त श्रेणीतील हायड्रेटिंग शॅम्पू वापरल्यानं केसांमधली आर्द्रता टिकून राहील. तर, चांगल्या कंडिशनरमुळे केस फ्रीझी होणार नाहीत. त्याशिवाय आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग केल्यानं केस मऊ राहातात व त्यांचं चांगलं पोषण होतं.
फ्रीझीपणावर नियंत्रण ठेवा: केस फ्रीझी होऊ नयेत यासाठी चांगल्या दर्जाचे हेअर सिरम वापरा. केस ओलसर असतानाच त्यातली आर्द्रता लॉक करून ठेवण्यासाठी सिरम लावा आणि केस मऊशार ठेवा. केस खूप फ्रीझी झाले असतील तर बोटोस्मूथ सारख्या उपचारांचा विचार करा. या उपचारांमुळे केसांची चमक परत येते आणि ते आर्द्र हवामानतही दीर्घ काळ मऊ राहातात.
हेअर स्टायलिंग करू नका: हीटिंगची साधने अती प्रमाणात वापरल्यानेही पावसाळ्यात केसांचे नुकसान होऊ शकते. केसांचा नैसर्गिक पोत स्वीकारा आणि ते वारंवार ब्लो- ड्राय करणं किंवा स्ट्रेटनिंग करणं टाळा. हीट वापरणं गरजेचं असेल, तर आधी केसांचे उष्णतेपासून रक्षण करणारे स्प्रे वापरा.
सोपी हेअर स्टाईल करा: वातावरण आर्द्र असताना केस मोकळे सोडण्याऐवजी पोनीटेल, अंबाडा किंवा वेणी घाला, म्हणजे केस सुरक्षित राहातील. या स्टाईल्समुळे केस एकमेकांत अडकणार नाही व तुटणार नाहीत. केस नीटनेटके राहातील. अशाप्रकारे केस बांधल्याने ते हवेतून खूप आर्द्रताही शोषून घेत नाहीत आणि फ्रीझीही होत नाहीत.
निरोगी आहार आणि भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे: तुमच्या केसांचे आरोग्य हे तुमच्या एकंदर आरोग्याचे प्रतीक असते. तुमचा आहार प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांनी परिपूर्ण असणे आवश्यक आहे. अंडी, सुकामेवा, पालक आणि बेरी फळे यांमुळे केसांची चांगली वाढ होते. केस आणि टाळू आतून आर्द्र राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने केसांची लवचिकता आणि मजबूती कायम राहाते.
पावसाळा म्हणजे खराब केस हे समीकरण आता विसरा. थोडी जास्त काळजी आणि योग्य उत्पादनांच्या मदतीने केसांची चांगली निगा राखा, म्हणजे ते सुंदर दिसतील. लक्षात ठेवा निरोगी केसांची सुरुवात चांगल्या हेअर केअर रूटिननेच होते.
संबंधित बातम्या