Monsoon Cleaning Tips: पावसाळयात दैनंदिन जीवनात विविध समस्या उद्भवतात. कपड्यांच्या काळजीपासून ते घराच्या स्वच्छतेपर्यंत अनेक गोष्टींची चिंता आपल्याला लागून असते. पावसाळ्यात सतत उद्भवणारा मुद्दा म्हणजे पाण्याच्या टाकीत माशांसारखा येणारा वास होय. या वासाने अनेकांना पाणी वापरण्याचीही इच्छा होत नाही. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे छतावर ठेवलेली पाण्याची टाकी सतत साफ करणे शक्य होत नाही. अशातच पावसाळ्यात पाण्याच्या टाकीमध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात साचून राहतात. त्यामुळे पाण्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी यायला सुरुवात होते. तुम्हालाही हीच समस्या उद्भवत असेल तर, आम्ही आज अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ही समस्या लगेच दूर होण्यास मदत होईल.
पावसाळ्याच्या दिवसात टाकीतून दुर्गंधी येऊ नये म्हणून पहिला उपाय म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वी पाण्याच्या टाकीचे झाकण घट्ट बंद करून ठेवावे. जेणेकरून पावसाचे पाणी किंवा कोणत्याही प्रकारचे दूषित पाणी टाकीमध्ये जाऊ शकत नाही. याशिवाय टाकीचा पाणीपुरवठा तपासावा. कारण टाकीच्या आत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमध्ये घाण असल्यानेसुद्धा पाणी दूषित होते. त्यामुळे सर्वप्रथम या गोष्टींची काळजी घ्यावी.
पावसाळ्यात, पाण्याच्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळे पाण्यामध्ये दुर्गंधी निर्माण करतात. ते दूर करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारे लिंबू वापरू शकता. पाण्याच्या टाकीत एक किंवा दोन कप लिंबाचा रस टाका आणि काही वेळ घरातील कोणताही नळ चालू करू नका. त्यामुळे थोड्याच वेळात लिंबाचा रस पाण्यात मिसळेल आणि हळूहळू बॅक्टेरियाही कमी होतील. अशाप्रकारे हे पाणी वापरण्यायोग्य बनेल. शिवाय दुर्गंधीही येणार नाही.
पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता होत नसल्याने पाण्याला दुर्गंधी येणे साहजिक आहे. पावसाळयात सतत टाकी साफ करणे शक्य नसते. परंतु महिन्यातून किमान एकवेळ टाकी स्वच्छ झालीच पाहिजे. अनेकजण हलगर्जीपणामुळे अनेक महिने टाकीची स्वच्छता करत नाहीत. अशा स्थितीत तुम्ही क्लोरीन किंवा लिंबू घालूनही दुर्गंधी दूर करू शकत नाही. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा टाकी पूर्णपणे स्वच्छ करा जेणेकरून शेवाळ आणि इतर बॅक्टेरिया दूर होतील.
पावसाळ्यात टाकीची साफसफाई करताना वारंवार समस्या येतात. यासाठी तुम्ही क्लोरीनच्या मदतीने पाण्यातून येणारा दुर्गंध दूर करू शकता. सांगायचं झालं तर, पावसाळ्यात टाकीमध्ये मातीचा थर साचतो ज्यामुळे पाण्याला कधीकधी दुर्गंधी येऊ लागते. मातीचा हा वास आणि पाण्यात असलेले कोणतेही जीवाणू दूर करण्यासाठी क्लोरीन हा सर्वोत्तम उपाय आहे. तुम्ही त्याची पावडर किंवा द्रव टाकीत घाला. नंतर फिल्टर केल्यानंतरच पाणी वापरावे. अशाने टाकीतील दुर्गंध आणि बॅक्टेरिया दूर होतील.