Sev Puri Recipe: पावसाळ्यात संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. पण पावसाळ्यात अनेक लोक बाहेर चाट खाणे टाळतात. तुम्ही सुद्धा बाहेरचे खाणे टाळत असाल आणि तुम्हाला चटपटीत चाट खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही घरीच शेव पुरी बनवू शकता. ही रेसिपी खायला जेवढी टेस्टी आहे तेवढीच ती बनवायला सोपी आहे. विशेष म्हणजे तुम्ही यासाठी पुऱ्या आधीच बनवून काही दिवस साठवून ठेवू शकता. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या घरी चटपटीच शेव पुरी कशी बनवावी.
- मैदा
- रवा
- उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे
- कांदा बारीक चिरलेला
- टोमॅटो बारीक चिरलेला
- शेव
- लाल चटणी
- चिंचेची गोड चटणी
- हिरवी चटणी
- चाट मसाला
- चिमूटभर जिरे पूड
- ओवा
- लिंबाचा रस
- तेल आवश्यकतेनुसार
- मीठ चवीनुसार
शेव पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुरी बनवून घ्या. पुरी बनवण्यासाठी आधी एका बाऊलमध्ये मैदा, रवा, मीठ, ओवा आणि तेल घालून चांगले मिक्स करा. यानंतर त्यात पाणी घालून पीठ मळून घ्या. नंतर या पीठाचा गोळा घेऊन पोळीप्रमाणे लाटून घ्या. नंतर छोट्या गोल कटरच्या किंवा वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुरी कापून घ्या. तुम्हाला कडक पुरी बनवायच्या असतील तर या पुऱ्यांवर चाकू किंवा फोर्कच्या सहाय्याने छिद्र करून घ्या. आता एका कढईत तेल गरम करून पुरी कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेल्या पुऱ्या तुम्ही काही दिवस साठवू शकता. आता शेवपुरी बनवण्यासाठी तुम्ही एका प्लेटमध्ये पुरी जमवून घ्या. तुम्हाला कडक पुरी नको असेल तर तुम्ही पाणीपुरीची गोल पुरी सुद्धा यासाठी वापरू शकता.
आता पुरी वर उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, कांदा, टोमॅटो टाका. नंतर यावर लाल चटणी, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घाला. नंतर चाट मसाला, जिरे पूड आणि मीठ शिंपडा. आता वरून शेव टाका. टाकून तीनही चटणी, सेव, चाट मसाला, मीठ आणि जिरे पूड घाला. शेवटी थोडासा लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.
संबंधित बातम्या