Monsoon Care: पावसाळ्यात बूट खराब झालेत, महागड्या लेदर शूजवर आलीय बुरशी? 'या' टिप्सने पुन्हा दिसतील नव्यासारखे-monsoon care tips use these tips to care for shoes during monsoon ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Monsoon Care: पावसाळ्यात बूट खराब झालेत, महागड्या लेदर शूजवर आलीय बुरशी? 'या' टिप्सने पुन्हा दिसतील नव्यासारखे

Monsoon Care: पावसाळ्यात बूट खराब झालेत, महागड्या लेदर शूजवर आलीय बुरशी? 'या' टिप्सने पुन्हा दिसतील नव्यासारखे

Aug 08, 2024 01:21 PM IST

Monsoon Care Tips: पावसाळ्यात बूट, लेदर शूज जपणे हे अवघड काम असते. सतत पाऊस, चिखल आणि वाढती आर्द्रता यामुळे बूट आणि इतरही चपला खूप खराब होतात.

पावसाळ्यात अशी घ्या बूटांची काळजी
पावसाळ्यात अशी घ्या बूटांची काळजी

Monsoon Care Tips: पावसाळ्यात भिजणे, गरमागरम पदार्थ खाणे जितकं आनंददायक वाटतं, तितकंच पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देणे कठीण वाटते. दैनंदिन आयुष्यात अनेक लहान-लहान अडचणी आपल्याला येत असतात. त्यातीलच एक म्हणजे आपली पादत्राणे सांभाळणे होय. पावसाळ्यात बूट, लेदर शूज जपणे हे अवघड काम असते. सतत पाऊस, चिखल आणि वाढती आर्द्रता यामुळे बूट आणि इतरही चपला खूप खराब होतात. विशेषतः जर तुमचे शूज लेदर किंवा नाजूक सामग्रीचे बनलेले असतील. जर तुम्ही ते व्यवस्थित जपले नाहीत, तर ते न वापरता शू रॅकमध्ये ठेवले तरी ते खराब होऊ शकतात. त्यांच्यावर बुरशी तयार होते. त्यामुळे ते विचित्र दिसू लागतात.

पावसाळ्यात अशी घ्या बूटांची काळजी-

मेणाचा वापर-

पावसाळ्यात बूट, चप्पल खराब होऊ नयेत यासाठी काही घरगुती उपायांनी तुम्हाला फायदा होईल. पावसाळ्यात तुम्ही तुमचे शूज वॉटरप्रूफ बनवण्यासाठी मेणाचा वापर करू शकता. बूटाच्या पृष्ठभागावर मेण चोळावा आणि नंतर त्यावर हेअर ड्रायरमधून गरम हवा द्यावी. अशाप्रकारे ते बूटामध्ये शोषले जाईल आणि तुमच्या बूटवर एकप्रकारचा वॉटरप्रूफ थर निर्माण होईल.

वॉटरप्रूफ स्प्रेचा वापर-

आजकाल पावसाळ्यासाठी वॉटरप्रूफिंग स्प्रे बाजारात किंवा शू स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहेत. जे तुम्ही शूजच्या पृष्ठभागावर फवारू शकता. असे केल्याने ते पाण्याच्या संपर्कात आल्यानंतरही खराब होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही चिंता न करता पावसातसुद्धा ते शूज आनंदाने वापरू शकता.

वॉटरप्रूफ शू कव्हरचा वापर-

अलीकडे पावसाळ्यात अनेकजण वॉटरप्रूफ शू कव्हर वापरत आहेत. हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पावसाळ्यात बाहेर फिरताना तुम्ही तुमच्यासोबत वॉटरप्रूफ शू कव्हर ठेऊ शकता. याकाळात जेव्हा पाऊस पडतो आणि तुम्हाला पावसात जावे लागते किंवा बाईक वगैरे चालवायचे असते तेव्हा हे कव्हर तुमच्या चपलावर-बुटांवर घाला. त्यामुळे तुमचे अगदी महागडे शूजही सुरक्षित राहतील.

अशी घ्या 'शूज'ची काळजी-

बऱ्याचवेळा तुम्ही एखादे शूज वापरत नाही. परंतु ते रॅकमध्ये ठेऊनसुद्धा खराब होतात. त्यामुळे त्यांचीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच पावसाळ्यात शूज हवेशीर आणि कोरड्या जागी ठेवा. ज्यामुळे ते आर्द्रतेपासून सुरक्षित राहतील. जर तुम्ही शू रॅक वापरत असाल तर ते एखाद्या कागदाने झाकून ठेवा आणि त्यात ओले झालेले शूज अजिबात ठेवू नका. तसेच डांबर गोळ्या रॅकमध्ये ठेवता येतात. या उपायांचा अवलंब करून, तुम्ही पावसाळ्यातही तुमचे शूज नवीन आणि चकचकीत ठेवू शकता.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)