Monsoon Health Care Tips for Pregnant Women: आपल्या संपुर्ण गर्भधारणेत आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत याची खात्री करण्यासाठी गर्भधारणेदरम्यान विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात होणारे व्हायरल इन्फेक्शन, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉइड, कॉलरा, सर्दी, फ्लू, ताप, डोळे आणि श्वसन संक्रमण, फंगल इंफेक्शन, पचन समस्या यांसारख्या आरोग्यविषयक परिस्थितींचा धोका वाढतो. बदलते हवामान, वातावरणाचा दाब आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाळ्यात आजारी पडण्याची शक्यता वाढते. म्हणून सुरक्षिततेची खबरदारी घेणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सच्या प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक आणि वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. कल्पना गुप्ता यांनी पावसाळ्यात प्रेग्नेंट महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स सांगितल्या आहेत.
डासांपासून स्वतःचे संरक्षण करा विशेषतः एडिस आणि ॲनोफिलीस जातीच्या डासांपासून बचाव करा. हे पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण आहेत. उघडे भांडे, बादल्या किंवा कुंड्यांमध्ये साचलेले पाणी या धोकादायक डासांसाठी उत्पत्ती स्थान बनू शकते. खिडक्या बंद ठेवा किंवा खिडक्यांना मच्छरांपासून सरंक्षण करणारी जाळी वापरा. विशेषत: सूर्यास्तानंतर तुमच्या घरात डास येण्यापासून रोखता येते.
पावसाळ्यात ओलावा आणि मुसळधार पावसामुळे जिना किंवा रस्ते निसरडे होतात. त्यामुळे सर्व निसरड्या आणि असमान रस्त्यांवर तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य प्रकारच्या आणि मजबुत फूडवेअरची निवड करावी.
गरोदरपणात महिलांना काही ठराविक पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असते. या पदार्थांमध्ये प्रामुख्याने स्ट्रीट फूड किंवा जंक फूडचा समावेश होतो, जे अधिक आकर्षक आणि स्वादिष्ट असतात. पावसाळ्यात जंक फूड किंवा स्ट्रीट फूड खाणे आई आणि बाळ दोघांसाठीही हानिकारक असू शकते आणि ते आरोग्याच्या विविध समस्यांना आमंत्रण देऊ शकतात. पावसाळ्यात अन्न आणि पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. कारण विविध रसायने, घाण, धुलीकण, सूक्ष्मजीव, विषाणू आणि जिवाणू हवेत आढळतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते. रस्त्यावर मिळणारी कापून ठेवलेली फळे तसेच उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा. कारण ते विविध डास, जीवाणू किंवा प्रदूषकांचे उत्पत्ती स्थान ठरु शकते, जे आई आणि बाळासाठी हानिकारक ठरते.
तुमच्या घरात तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. विशेषत: गर्भधारणेदरम्यान तुम्हाला आणि तुमच्या बाळाला आरोग्याच्या अनेक गुंतागुंत पासून वाचवण्यास याची मदत होते. हे आवश्यक काळजी घेऊन करता येते, जसे की अन्न शिजवण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी आपले हात नीट धुवा, आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा संपूर्ण घर स्वच्छ करा आणि डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणी आणि रिपेलेंट्स वापरा. पाणी पिण्याआधी ते उकळूण घ्यायला विसरु नका. असे केल्याने पाण्यातील जीवाणू आणि प्रदूषक नष्ट होतात आणि बाष्पीभवन होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या