मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  भारतावर मंकीपॉक्सचं सावट; केंद्र सरकारनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

भारतावर मंकीपॉक्सचं सावट; केंद्र सरकारनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 21, 2022 08:34 AM IST

Monkeypox : मंकीपॉक्स या नव्या रोगाचे रुग्ण जगभरात वाढत असताना आता भारत सरकारनं याबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या रोगावर आणि स्थितीवर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि ICMR बारकाईनं लक्ष ठेऊन आहेत.

Monkeypox Threat To India
Monkeypox Threat To India (HT)

Monkeypox Threat To India : गेल्या काही दिवसांपासून जगभरात मंकीपॉक्स नावाच्या महाभयंकर रोगानं थैमान घातलेलं आहे. विशेषत: यूरोपिय देशांमध्ये या रोगाचे हजारोंच्या संख्येनं रुग्ण सापडत असल्यानं चिंता वाढल्या आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारनंही खबरदारी उपाय म्हणून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळं हैराण असलेल्या लोकांना मंकीपॉक्समुळं पुन्हा धक्का बसलेला आहे. त्यामुळं आता या रोगाचा भारतात शिरकाव होऊ नये आणि परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिले आहेत. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विमानतळं आणि बंदरातील आरोग्य अधिकाऱ्यांना नेहमी सतर्क राहण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. या रोगावर आणि स्थितीवर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि ICMR बारकाईनं लक्ष ठेऊन असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

भारत सरकार काय उपाययोजना करणार?

मंकीपॉक्स या घातक आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णाला भारतात आल्यानंतर त्याला तातडीनं क्वारंटाईन करण्यात येणार आहे. याशिवाय त्याच्या रक्ताचे नमुने हे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीत पाठवून त्याची तपासणी करण्यात येणार आहे.

या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर असणार लक्ष...

इंग्लंड, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन आणि इतर यूरोपिय देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे. त्यांच्यावर विमानतळं तसेच बंदरावरही लक्ष ठेवलं जात आहे. मंकीपॉक्स ताप, पुरळ आणि सुजलेल्या लिम्फ नोड्ससह माणसांमध्ये दिसून येतो, त्यामुळं अशा रुग्णांना ओळखणं फार कठीण जाणार नाही. तरीदेखील सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स हा कांजिण्याप्रमाणे एक पॉक्स असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु अजूनही या संसर्गजन्य रोगाच्या प्रसाराचं कारण, त्याचा उपाय आणि उपचार सापडलेले नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये इंग्लंड आणि अमेरिकेत या घातक आजाराचे हजारोंच्या संख्येनं रुग्ण सापडल्यानं या देशांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळं विविध देशांनी या गंभीर संसर्गजन्य आजाराबाबत खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे.

काय आहेत मंकीपॉक्स रोगाची लक्षणं?

१. स्नायूंमध्ये वेदना आणि थंडी वाजून येणं

२. सातत्यानं थकवा जाववणं

३. तीव्र ताप आणि न्यूमोनिया होणं

४. शरीरावर गडद लाल ठिपके येणं

५. डोकेदुखीचा त्रास होणं

WhatsApp channel

संबंधित बातम्या