मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Menopause Journey: रजोनिवृत्तीचा करा एकत्र स्वीकार, जाणून घ्या या नव्या पर्वातून कपलने कसा काढावा मार्ग

Menopause Journey: रजोनिवृत्तीचा करा एकत्र स्वीकार, जाणून घ्या या नव्या पर्वातून कपलने कसा काढावा मार्ग

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 09, 2024 11:38 PM IST

Women's Health Tips: मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून योग्य साथ मिळाली तर त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.

रजोनिवृत्तीच्या काळात कपलने कसा मार्ग काढावा
रजोनिवृत्तीच्या काळात कपलने कसा मार्ग काढावा (unsplash)

Tips For Couple To Deal Menopause: पंखा, एसी सुरू असतानाही आपल्या पार्टनरला अचानक प्रचंड उकडत असल्यासारखे का वाटतेय किंवा तिच्या रात्रीच्या झोपेत सतत अडथळा का येत आहे किंवा अलीकडे ती थोडी अधिकच विसराळू का झाली असे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का? या सगळ्या प्रश्नांचे एक संभाव्य कारण म्हणजे ती मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या काळामधून जात आहे. भारतीय महिलांना वयाच्या सुमारे ४६व्या वर्षी रजोनिवृत्ती अनुभवास येते आणि हा काळ शरीरासाठी इतर अनेक बाबतीत संक्रमणाचा असतो. महिलांची रजोनिवृत्ती ही काही त्यांच्या एकट्यापुरती घडणारी गोष्ट नसते. याचाच अर्थ या बदलांचा परिणाम त्यांच्या नात्यावरही पडू शकतो. आपण एका नव्या पर्वामध्ये प्रवेश करत आहोत, गोंधळातून, गैरसमजुतींमधून मार्ग काढत आहोत असे कपल्सना वाटू शकते. स्त्रीच्या आयुष्यातील हा नैसर्गिक टप्पा समजून घेतल्यास तिला योग्य तो आधार देण्यासाठीची तयारी तिचा जोडीदार करू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

कोणती लक्षणे जाणवतात

मेनोपॉजमुळे स्त्रीचे आरोग्य, स्वास्थ्य आणि सामाजिक आयुष्य अशा तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम होतो. खरं तर मेनोपॉजमुळे स्त्रियांच्या वैयक्तिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो असे ८२ टक्‍के लोकांचे मत असल्याचे अबॉट आणि इप्सोस यांनी भारतामध्ये केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी मेनोपॉजची चिन्हे वेगवेगळी असू शकतात, स्त्रियांना अचानक उष्मा जाणवणे (हॉट फ्लॅशेस), रात्री घामाघूम होणे (नाइट स्वेट्स), थकवा किंवा सांधेदुखी यांसारखी सर्वसाधारण लक्षणे जाणवू शकतात. भावनांविषयी बोलायचे तर काही स्त्रियांना मूड स्विंग्स अनुभवास येऊ शकतात. सौम्यशी चिंता सतावू शकते किंवा नैराश्य जाणवू शकते. हा टप्पा नीट हाताळला नाही तर मेंदूची विचारशक्ती धूसर होणं (ब्रेन फॉग), चिडचिडेपणा आणि आत्मविश्वास नाहीसा होणे यांसारख्या लक्षणांमुळे स्त्रीच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो.

कसा परिणाम होतो

अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स विभागाच्या प्रमुख रोहिता शेट्टी म्हणाल्या, “आमच्या स्थानिक सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 70% जणांनी सुचविल्यानुसार मेनोपॉजमुळे स्त्रीच्या सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. अनेक स्त्रियांना शारीरिकदृष्ट्या विकल करणारी लक्षणे जाणवू शकतात. तरीही बहुतांश स्त्रिया यासंदर्भात अगदी आपल्या डॉक्टरांशीही संवाद साधायला संकोचतात. यामुळे त्यांना एकटं पडल्याचा अनुभव येऊ शकतो. अर्थपूर्ण संवादाला प्रोत्साहन देण्याची मदत होऊ शकते आणि आम्ही संवादाला प्रारंभ करून देणाऱ्या एका मनोवेधक चर्चेच्या माध्यमातून मेनोपॉज या विषयावरील मौन तोडण्याचा प्रयत्न करत आहोत. महिलांच्या बाबतीत सांगायचे तर आपल्या जोडीदाराशी खऱ्या पद्धतीने जोडले जाण्याचे मार्ग शोधल्याने आणि आपल्या या अनुभवाविषयी खुलेपणाने बोलल्याने त्यांच्या मनाला उभारी वाटू शकते.”

कपलने काय करावे

मेनोपॉजमधून मार्ग काढण्याचे काम दोघांनी मिळून करता येणे शक्य आहे. रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील स्त्रीला तिच्या या वाटचालीदरम्यान सामोऱ्या येणाऱ्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे इथपासून या प्रयत्नांची सुरुवात करता येईल. सर्वेक्षणात सहभागी झालेले ७८ टक्‍के लोक आपल्या जोडीदारासोबत सुदृढ लैंगिक संबंध ठेवणे सोडून देतात, हेही लक्षात आले आहे. याचे एक कारण म्हणजे मेनोपॉजमुळे योनीमार्गाचा कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे शारीरिक जवळीकीचा प्रश्न येतो तेव्हा त्यात काही बदल होऊ शकतात हे स्वीकारणे महत्त्वाचे आहे. कठीण वाटले तरीही जोडीदाराशी पुन्हा एकदा नाते जोडणे ही या समस्येची उकल आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel