Mangala Gauri Special: श्रावणातील प्रत्येक मंगळागौर बनवा खास! 'या' घरगुती उपायांनी चेहरा चंद्रासारखा चमकेल-mangala gauri special make honey face pack at home for glowing face ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mangala Gauri Special: श्रावणातील प्रत्येक मंगळागौर बनवा खास! 'या' घरगुती उपायांनी चेहरा चंद्रासारखा चमकेल

Mangala Gauri Special: श्रावणातील प्रत्येक मंगळागौर बनवा खास! 'या' घरगुती उपायांनी चेहरा चंद्रासारखा चमकेल

Aug 06, 2024 11:36 AM IST

Mangala Gauri Beauty Special: प्रत्येक सणाला आपण चारचौघींमध्ये उठून दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. त्यामुळेच जर या खास सणामध्ये तुमचा चेहरा उजळण्यासाठी पार्लरमध्ये तासनतास घालवत असाल तर, आता त्याची गरज नाही.

Mangala Gauri Beauty Special:
Mangala Gauri Beauty Special:

Mangala Gauri Beauty Special:  श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यात पूजापाठ आणि उपवास करण्यासोबतच, विविध सण साजरे केले जातात. हा महिना स्त्रियांसाठी अगदीच खास असतो. कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौर साजरी करतात. अशात प्रत्येक सणाला आपण चारचौघींमध्ये उठून दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. त्यामुळेच जर या खास सणामध्ये तुमचा चेहरा उजळण्यासाठी पार्लरमध्ये तासनतास घालवत असाल तर, आता त्याची गरज नाही. पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याऐवजी घरीच मधापासून काही उपाय करा. असे केल्याने तुमचा चेहरा लगेच चमकू लागेल. सणांमध्ये गोरी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही मधाचे फेस पॅक कसे लावू शकता ते आज आपण जाणून घेणार आहोत.

'मधाच्या वापराने बनवा विविध फेस पॅक'

१) मध आणि दालचिनीपासून बनवा फेस पॅक-

चेहऱ्यावरील मुरुमांचा सामना करण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हा मधाचा फेस पॅक तुम्ही लावू शकता. यासाठी एक चतुर्थांश चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यांनंतर कोमट पाण्याने आणि फेसवॉशने चेहरा धुवून टाका. नंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर वापरा.

२) मध आणि चंदनाचा फेस पॅक-

सणासुदीमध्ये चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी मध आणि चंदन पावडरचा फेस पॅक बनवा. हे करण्यासाठी एक चमचा मध आणि चंदन पावडर मिक्स करून पेस्ट बनवा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आणि फेस क्लींजरने चेहरा धुवून स्वच्छ करा. चेहरा पहिल्या वापरातच चमकायला लागेल.

३) मध आणि केशरचा फेस पॅक-

या घरगुती फेस पॅकने चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी केशरचे काही धागे एक चमचा मधात सुमारे १५ते २० मिनिटे भिजत ठेवा. आता एकजीव करून घ्या. त्यांनंतर ते चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. वाळल्यानंतर कोमट पाण्याने आणि फेसवॉशने धुवून टाका.

४) मध आणि पपईचा फेस पॅक-

हा फेस मास्क लावून तुम्ही तुमची त्वचा मऊ, स्वच्छ आणि चमकदार बनवू शकता. यासाठी फक्त एक चमचा पपईच्या गरामध्ये एक चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. त्यानंतर १५ मिनिटांनी पुसून टाका. त्यानंतर पाण्याने आणि फेसवॉशने चेहरा धुवून घ्या. चेहरा अक्षरशः चमकू लागेल.

५) मध आणि दहीचा फेस पॅक-

हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावर झटपट चमक येते. याशिवाय त्वचा मऊ आणि कोमल होईल. यासाठी एक चमचा मधामध्ये एक चमचा दही आणि एक चमचा मुलतानी माती मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. नंतर धुवा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)