Malvani food festival: मालवण म्हटलं की, डोळ्यांसमोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे चमचमीत मासे आणि निळाशार समुद्र. निसर्ग देवतेचा वरदहस्त लाभलेल्या मालवणमध्ये गेल्यावर प्रत्येकालाच तिथल्या खाद्य पदार्थांची भुरळ पडते. भरपूर खोबरं अर्थात ओला नारळ, मालवणातील घराघरांत पिकणारे आणि बनवले जाणारे खास मालवणी मसाले आणि मासे यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सगळ्यांचेच आवडते आहेत. अगदी आजही एखाद्या मालवणी हॉटेलबाहेर जेवणासाठी रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. आता याच मालवणी खाद्यपदार्थांची चव देशातील दाक्षिणात्य भागात देखील खवय्यांना चाखायला मिळणार आहे.
गेली ३० वर्षांपासून वैविध्यपूर्ण मालवणी रुचकर-लज्जतदार पदार्थांवर खाद्यसंस्कार करून मालवणी खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या सुरेखा व नितीन वाळके यांनी खवय्यांच्या मनात अव्वल स्थान पटकावले आहे. तामिळनाडूच्या चेन्नईतील अस्सल खवय्यांना मालवणी पदार्थांची खरी चव २५ जून ते ३० जून या दिवसांत चाखता येणार आहे. ‘द टेस्ट ऑफ मालवण’ या नावाने 'रेन ट्री' या तारांकित हॉटेलमध्ये 'मालवणी खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यात ‘चैतन्य'च्या सर्वेसर्वा सुरेखा वाळके आणि नितीन वाळके, ‘चैतन्य’ व्हेंचर्सच्या मार्केटिंग व संशोधन प्रमुख सायली वाळके, मालवण चैतन्यचे शेफ प्रथमेश कुलकर्णी हे चेन्नईतील खवय्यांना मालवणी पाककृती खिलवणार आहेत.
यात तिरफळ घातलेलं माशाचं तिखलं, माशाच्या जेवणाबरोबर पाल्याची भाजी, कुळिथाची पिठी, शिरवाळे, नाचणीचा हलवा, चिकनची सुक्की सागोती, ओल्या काजूची उसळ, आंब्याचं रायतं, कुयरीची भाजी आणि तव्यावर कमी तेलात भाजलेले मासे असे पदार्थ सादर केले जाणार आहे. तीन दशकांचं संशोधन, मेहनत, विचार, जिद्द आणि त्याग सर्व काही या मालवणी खाद्यपदार्थ महोत्सवात पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे.
‘चैतन्य’ची अन्नपूर्णा सुरेखा वाळके यांचा आपल्या जेवणाचा तगडा अभ्यास, पाण्याची चव, मिठाचा पोत, नारळाचा दर्जा, मसाल्यांचा दर्जा, त्याचं प्रमाण, तापमान, त्याच बरोबर मालवणी पाककृतींमध्ये ऋतू व ठिकाण परत्वे होणारा बदल यांचा अभ्यास, कच्च्या मालाची पुरवठा साखळी आणि सोबतीला नितीन वाळके यांची दूरदृष्टी, विपणन कला, सोबत २००हून अधिक सेवा पुरवणारे हात आणि ज्याची गणतीच नाही असे चवीने खाणारे खवय्ये हे चैतन्यचे आधारस्तंभ आहेत.
संबंधित बातम्या