Malala Day History and Significance: पाकिस्तानी शिक्षण कार्यकर्त्या आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई यांचे जीवन आणि वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी १२ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मलाला दिन साजरा केला जातो. मुलींच्या शिक्षणाच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या मलालाला ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तालिबानी बंदूकधारीने डोक्यात आणि मानेवर गोळी झाडली, तेव्हा पहिल्यांदा जागतिक स्तरावर मलाला ओळख मिळाली.
संयुक्त राष्ट्रसंघाने १२ जुलै २०१३ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मलाला दिन साजरा केला. पाकिस्तानात महिला शिक्षणावरील निर्बंधांना विरोध केल्यामुळे तालिबानी बंदूकधारीने मलालाला गोळ्या घातल्याच्या वर्षभरानंतर हे घडले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीला ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी संबोधित केले होते, जे त्यावेळी जागतिक शिक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत म्हणून कार्यरत होते. हा दिवस मलालाच्या वाढदिवसाच्या दिवशीही साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसार, हा दिवस जगातील अनेक नेत्यांना मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन करतो. शिक्षण हा विशेषाधिकार नसून तो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, यावर भर देण्यात आला आहे.
मलाला दिनाला खूप महत्त्व आहे जे शिक्षण आणि महिलांच्या अधिकारांचे महत्त्व अधोरेखित करते. हा दिवस आठवण करून देतो की वैयक्तिक निर्धार आणि एखाद्याच्या विश्वासासाठी उभे राहण्याचा जगावर खोल वर परिणाम होऊ शकतो. आजही दर्जेदार शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो मुलांच्या व्यथांकडे या दिवशी लक्ष वेधले जाते.
१२ जुलै १९९७ रोजी जन्मलेली मलाला एक पाकिस्तानी कार्यकर्ती आणि नोबेल पारितोषिक विजेती आहे. मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या अॅडव्होकेसीसाठी त्यांना वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी २०१४ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.
२००९ मध्ये मलालाने आपल्या मूळ गावी वाढत्या लष्करी कारवायांबद्दल आणि आपल्या शाळेवर हल्ला होईल या भीतीबद्दल टोपण नावाने ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, असे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या वेबसाइटवर लिहिले आहे. तिची ओळख उघड झाल्यानंतर मलाला आणि तिचे वडील झियाउद्दीन शिक्षणाच्या हक्कासाठी आवाज उठवत राहिले.
मुलींच्या शिक्षणाच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांविषयी जागरूकता आणण्यासाठी आणि मुलींना बदलाची मागणी करण्यासाठी सक्षम करण्यासाठी तिने आणि तिच्या वडिलांनी २०१३ मध्ये मलाला फंडाची स्थापना केली.
संबंधित बातम्या