दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. जी या वर्षी १५ एप्रिल रोजी आहे. जैन धर्मांतील २४वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी दिलेला सत्य व अहिंसेची शिकवणी जीवनाला दिशा देणारी आहे. बालपणी त्यांना वर्धमान यानावाने हाक मारली जायची. जैन धर्माच्या शोधाबरोबरच त्यांनी त्याची मुख्य तत्त्वे प्रस्थापित केली. दरवर्षी जैन मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात महावीर जयंती साजरी केली जाते. काय आहेत महावीरांचे सिद्धांत, महावीर जयंतीचे महत्त्व जाणून घेऊया.
२४वे व शेवटचे तीर्थंकरः महावीर स्वामी हे जैन धर्माचे २४वे आणि शेवटते तीर्थंकर होते. इ.स. पूर्व ५४० मध्ये बिहारमधील एका राजघराण्यात त्यांचा जन्म झाला असून, ते राजा सिद्धार्थ व राणी त्रिशाला यांचे पुत्र होते. त्यांच्या जन्माच्या वेळी लोक सुखी आणि समृद्ध होते, त्यामुळे त्यांचे नाव वर्धमान ठेवण्यात आले. असे मानले जाते की, त्यांच्या जन्मापासून त्यांच्या आईला ते सम्राट बनतील की तीर्थंकर बनतील अशी आश्चर्यकारक स्वप्ने पडू लागली. त्यांच्या जन्मानंतर भगवान इंद्रांनी त्यांना तीर्थंकराच्या रुपात स्वर्गातील दुधाने अनुष्ठान पूर्वक स्नान घातले होते, असे म्हटले जाते.
जैन धर्माचे संस्थापकः भगवान महावीर यांना ध्यान आणि जैन धर्मात जास्त आवड होती. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी आध्यात्मिक मार्ग अवलंबला आणि जैन धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी त्यांच्या सिंहासनाचा त्याग केला. १२ वर्ष आणि ६ महिन्यांच्या सखोल ध्यान केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास सुरू केला आणि लोकांना सत्य, असत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य आणि स्वैराचार याविषयी शिकवण दिली. त्यांनी ३० वर्षे सतत प्रवास केला. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी निर्वाण प्राप्त केले आणि ते जैन धर्माच्या महान तीर्थंकरांपैकी एक झाले.
महावीर स्वामींचे सिद्धांतः भगवान महावीर यांचे सर्वात मोठे सिद्धांत म्हणजे अहिंसा आहे. त्यांच्या प्रत्येक अनुयायाने अहिंसा, सत्य, आचौर्य, ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह या पाच व्रतांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले आहे. लोकांनी अहिंसेच्या मार्गावर चालावे यावर त्यांचा भर होता. नेहमी सत्य बोलावे आणि सत्यची कास धरून चालावी अशी त्यांची शिकवण होती. लोकांनी प्रामाणिक असावे आणि चोरी करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. कामुक सुखाला आणि भौतिक गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे, असे त्यांची शिकवण होती. अहिंसा हाच परम धर्म ही जैन विद्वानांची मुख्य शिकवण आहे.
संबंधित बातम्या