Potato Halwa Recipe: यंदा महाशिवरात्री हा सण ८ मार्च रोजी साजरा होणार आहे. मान्यतेनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भक्त भगवान शंकराची पूजा करतात आणि उपवास देखील करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेबाबाची विशेष पूजा केल्याने तो प्रसन्न होतो. पूजेत प्रसादाचे विशेष महत्त्व आहे. म्हणून जर तुम्हाला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रसाद अर्पण करायचे असेल तर तुम्ही बटाट्याचा हलवा बनवू शकता. विशेष म्हणजे हा हलवा तुम्ही फक्त प्रसादाला नाही तर उपावासाला देखील खाऊ शकता. चला तर मग जाणून घ्या बटाट्याचा हलवा कसा बनवायचा.
- ३ मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे
- २ ते ३ चमचे देशी तूप
- १/२ चमचा साखर किंवा ब्राऊन शुगर
- १/२ कप दूध
- १/२ कप काजू
- १/४ कप बदाम
- १ चमचा वेलची पावडर
- १/२ चमचा मनुका किंवा तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स
प्रसादासाठी बटाट्याचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे चांगले धुवून उकळून घ्या. थंड झाल्यावर साल काढून टाका. उकडलेले बटाटे नीट किसून घ्या किंवा हाताने मॅश करा. बटाट्याचे तुकडे राहणार नाही याची काळजी घ्या. पॅनमध्ये ३ चमचे तूप टाका आणि त्यात उकडलेले बटाटे टाका. मंद आचेवर तीन ते चार मिनिटे सतत भाजून घ्या. जोपर्यंत बटाटे पॅनला चिकटत नाहीत आणि नंतर तळ सोडत नाही. नंतर त्यात दूध टाका आणि सोबत साखर घाला. साधारण दहा मिनिटे या पद्धतीने ढवळत राहा आणि भाजून घ्या. हे सुकायला लागल्यावर त्यात वेलची पूड घाला. चांगले मिक्स करा. दुसऱ्या पॅनमध्ये देशी तूप घालून काजू चांगले भाजून घ्या. त्याचप्रमाणे बदाम आणि किशमिश भाजून बाहेर काढा. तुम्हाला हवं असल्यास हलव्यात संपूर्ण काजू आणि बदाम टाकू शकता किंवा ते बारीक चिरून देखील टाकू शकता. तुमचा बटाट्याचा हलवा तयार आहे.
संबंधित बातम्या