मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mahashivratri Bhog: महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा संत्र्याच्या खीरचा प्रसाद, बनवण्यासाठी पाहा रेसिपी

Mahashivratri Bhog: महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा संत्र्याच्या खीरचा प्रसाद, बनवण्यासाठी पाहा रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 08, 2024 08:54 AM IST

Mahashivratri Prasad Recipe: तुम्हाला महाशिवरात्रीला प्रसादासाठी काहीतरी वेगळे बनवायचे असेल तर तुम्ही संत्र्याची खीर बनवू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

संत्र्याची खीर
संत्र्याची खीर (freepik)

Orange Kheer Recipe: आज ८ मार्च रोजी देशभरात महाशिवरात्री साजरी होत आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त उपास करतात. महाशिवरात्रीला भोले बाबांना प्रसाद म्हणून अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात. तुम्हालाही प्रसादासाठी काहीतरी वेगळं आणि टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही संत्र्याची खीर ट्राय करू शकता. ही रेसिपी खायला चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. विशेष म्हणजे तुम्ही हे उपवासाला खाऊ शकता. चला तर मग जाणून घ्या संत्र्याची खीर बनवण्याची रेसिपी.

संत्र्याची खीर बनवण्यासाठी साहित्य

- संत्री - १/२ किलो

- दूध - १ लिटर

- मिल्क मेड - १०० ग्रॅम

- केशर - १ चिमूट

- मावा - १०० ग्रॅम

- वेलची पावडर - १/२ टीस्पून

- ड्राय फ्रूट्स - २ चमचे

- साखर - चवीनुसार

संत्र्याची खीर बनवण्याची पद्धत

महाशिवरात्रीला प्रसादासाठी संत्र्याची खीर बनवण्यासाठी प्रथम ड्रायफ्रुट्सचे छोटे तुकडे करून बाजूला ठेवा. यानंतर एका भांड्यात दूध घ्या आणि मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. दूध अर्धे होईपर्यंत उकळवा. दरम्यान संत्र्याची साल काढा. त्याच्या फोडी नीट फोडून त्यातील गर एका भांड्यात काढून ठेवा. जेव्हा दूध उकळून अर्धे होईल तेव्हा त्यात मिल्क मेड आणि मावा घालून मिक्स करा. दुधाला आणखी दोन मिनिटे उकळू द्या. यानंतर या मिश्रणात अर्धा चमचा वेलची पूड, कापलेले ड्रायफ्रूट्स आणि केशरचे काही धागे घालून मिक्स करा. आता गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. दुधाचे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात संत्र्याचा गर घाला. हे सर्व चांगले मिक्स करा. आता हे १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. तुमची टेस्टी संत्र्याची खीर तयार आहे. महादेवाला प्रसाद म्हणून अर्पण करा.