Health Benefits of Bel patra or Bilva Leaves: हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला महाशिवरात्री यंदा ८ मार्च रोजी साजरी होणार आहे. या सणाच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला असे मानले जाते. या दिवशी भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि शिवलिंगाची पूजा करतात. या दिवशी पूजा करताना महादेवाला पाण्यासोबत धतुरा आणि बेलपत्र अर्पण केले जातात. असे म्हटले जाते की बेलपत्र हे भगवान शंकराचे सर्वात आवडते पान आहे. हे एक त्रिकोणी पान आहे, जे हिंदू धर्मातील तीन मुख्य देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच शिव यांचे प्रतीक मानले जाते. एवढेच नाही तर बेलपत्र हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानली जाते आणि अनेक रोगांचा सामना करण्यास मदत करू शकते. चला तर जाणून घ्या महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत.
बेलाच्या पानामध्ये कॅल्शियम आणि फायबर तसेच व्हिटॅमिन ए, सी, बी१, आणि बी६ सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. ही पाने आरोग्याच्या अनेक समस्यांवर फायदेशीर आहेत. हे पान रोज खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. हृदयाचे आरोग्य आणि लिव्हर सुधारण्यास मदत करू शकते.
निरोगी राहण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलाची पाने खा. यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. हे पान रोज रिकाम्या पोटी खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.
बेलच्या पानांमध्ये जास्त फायबर असते, म्हणून ते पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राची पाने खाऊ शकता. हे खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळतो. जर एखाद्याला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर हे पान खाल्ल्याने ते बरे होऊ शकते. या पानामुळे पचनक्रिया मजबूत होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेलपत्र फायदेशीर मानले जाते. बेलच्या पानांमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवश्यक असतात. बेलाची पाने रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
अहवालानुसार बेलपत्राचे पान दिवसाच्या कोणत्याही वेळी खाल्ले जाऊ शकते. हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने असंख्य फायदे मिळू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)