Activities to protest the Kolkata case on social media: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेवर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या घटनेने सर्वजण हादरून गेले आहेत. कामाच्या ठिकाणीसुद्धा महिला सुरक्षित नाहीत, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. कनिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर रस्त्यावर आले आहेत. त्याबरोबरच आता सर्वसामान्य लोकसुद्धा विविधप्रकारे निषेध व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. तत्पूर्वी महिलांनी सोशल लक्षवेधी उपक्रम राबवत सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडले आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडिया हा एक अत्यंत प्रभावी माध्यम समजला जातो. सोशल मीडियावर लोक फोटो, व्हिडीओपासून विविध गोष्टी शेअर करत असतात. आजकाल सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही. बऱ्याचदा सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर केले जातात. विविध महिलासुद्धा आपले सुंदर असे प्रोफाइल पिक्चर ठेवत असतात. त्यांना लोकांकडून प्रशंसाही मिळत असते.
मात्र या जगात स्त्रियाच नसतील तर? हे जग स्त्रियांशिवाय कसे भासेल? कोलकाता बलात्कार-हत्या प्रकणाला विरोध म्हणून आणि लोकांना महिलांचे महत्व पटवून देण्यासाठी सोशल मीडियावर एक लक्षवेधी उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे यामध्ये अनेक पुरुषांनी आणि ट्रान्सजेंडरनीसुद्धा सहभागी होत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सोशल मीडियावर या प्रकरणाच्या निषेधात पोस्ट, रिल्स आणि व्हिडीओ टाकण्याऐवजी,काल रक्षाबंधन दिवशीच म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी सर्व महिलानीं सोशल मीडियावर गायब व्हायचे ठरवले. अर्थातच महिलानी आपल्या प्रोफाईलच काळ्या केल्या होत्या. पाहूया नेमकं काय घडलं होतं. काल रात्री ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत महिला ब्लॅकआउट झाल्या होत्या. महिलांशिवाय जग प्रत्यक्षात कसे असेल हे दाखवण्यासाठी ही चळवळ चालवली जात आहे. तुमचा प्रोफाईल फोटो पूर्णपणे काळा करा जेणेकरून पुरुषांना आश्चर्य वाटेल की सर्व महिला कुठे गेल्या आहेत. ही महिला अत्याचाराविरुद्धची चळवळ आहे. हे प्रत्येक मुलींना कळायला हवे. त्यासोबतच पुरुषांनीसुद्धा नैतिकता दाखवत यामध्ये सहभागी व्हावे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कोलकाताचा प्रिन्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर आपला डीपी ब्लॅक केला आहे. कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध व्यक्त करत गांगुलीने असे केले आहे. कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या या घृणास्पद गुन्ह्यानंतर सोशल मीडियावरील हजारो युजर्सनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरसाठी न्याय मिळावा यासाठी असे केले आहे.