Kojagiri Special Kheer Recipe : कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की, पहिला डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मसाला दूध. या पदार्थाशिवाय हा सण अपूर्ण आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री प्रत्येक घरी मसाला दूध बनवले जाते. यानंतर हे दूध रात्री पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाशात ठेवले जाते. कोजागिरीला पडणारा चंद्राचा प्रकाश शरीरासाठी आणि आरोग्यासाठी फार चांगला असतो, असे मानले जाते. त्यामुळे काही लोक कोजागिरीच्या रात्री जागरण करतात. रात्री चंद्र प्रकाशात आपल्या जवळच्या लोकांसोबत बसून छान गप्पा मारत, गाण्यांच्या भेंड्या खेळत हा सण साजरा होतो. काही ठिकाणी या रात्री मसाला दुधाऐवजी खास खीर केली जाते. हीच खीर चंद्र प्रकाशात ठेवून नंतर सगळ्यांना वाटली जाते. मसाला दुधाऐवजी या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही देखील खीर ट्राय करू शकता. ही रेसिपी खास तुमच्यासाठी...
१ लिटर फुल क्रीम दूध
१५० ग्रॅम बासमती तुकडा तांदूळ
१ टेबलस्पून तूप
१० काजू
१० बदाम
१० पिस्ते
१ टेबलस्पून गुलाबपाणी
पाव किलो साखर
अर्धा चमचा वेलची पूड
१५ ते २० गुलाब पाकळ्या
४ ते ५ काड्या केशर
> बासमती तुकडा तांदूळ स्वच्छ धुवून, २०-२५ मिनिटे बाजूला ठेवा.
> आता दूध एका पातेल्यात घेऊन मध्यम आचेवर उकळायला ठेवा.
> दुसऱ्या कढईत तूप गरम करून त्यात तांदूळ घालून चांगले भाजून घ्या.
> दूध उकळू लागले की, त्यात परतून घेतले तांदूळ त्यात घाला आणि दोन्ही एकसंध होईपर्यंत २० ते २५ मिनिटे शिजवून घ्या.
> काजू, बदाम आणि पिस्त्याचे छोटे तुकडे किंवा काप करा.
> खीर चांगली शिजल्यानंतर गॅस बंद करून, त्यात साखर घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.
> यानंतर त्यात काप केलेले ड्रायफ्रुट्स, गुलाब पाणी, वेलची पावडर आणि केशर घालून मिक्स करा.
> एका भांड्यात खीर काढून गुलाबाच्या पाकळ्यांनी छान सजावट करा.
> या खीरीच्या भांड्यावर पातळ कापड बांधून खीर चांगली झाकून चंद्रप्रकाशात ठेवा आणि नंतर ही खीर सगळ्यांना खाऊ घाला.
उत्तर भारतातील अनेक ठिकाणी कोजागिरीच्या रात्री म्हणजेच शरद पौर्णिमेच्या रात्री ही खीर बनवली जाते. तुम्ही देखील यावर्षी आपल्या कुटुंबासोबत या चविष्ट खीरीचा आनंद घेऊ शकता.
संबंधित बातम्या