Brain Tumor: ब्रेन ट्यूमरचे सुद्धा असतात प्रकार, जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brain Tumor: ब्रेन ट्यूमरचे सुद्धा असतात प्रकार, जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार

Brain Tumor: ब्रेन ट्यूमरचे सुद्धा असतात प्रकार, जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार

Published May 31, 2024 09:59 PM IST

Types of Brain Tumor: तुम्हाला माहीत आहे का ब्रेन ट्यूमरचे सुद्धा प्रकार असतात. जाणून घ्या हे कसे होते, याची लक्षणे आणि उपचार.

ब्रेन ट्यूमरचे प्रकार, कारणं, लक्षणं आणि उपचार
ब्रेन ट्यूमरचे प्रकार, कारणं, लक्षणं आणि उपचार (unsplash)

Brain Tumor Symptoms and Treatment: ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील पेशींची असामान्य वाढ आहे, जी CANCEROUS किंवा NON - CANCEROUS असू शकते. तुम्हाला माहीत आहे का ब्रेन ट्यूमरचे सुद्धा प्रकार असतात. तळेगाव येथील टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरच्या एमडी रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती मेहता यांनी ब्रेन ट्यूमरचे प्रकार, हे होण्याची कारणे, त्याची लक्षणे आणि याचे निदान व उपचार कसे करावे याबाबत सांगितले, जाणून घ्या.

ब्रेन ट्यूमरचे प्रकार

ब्रेन ट्यूमरचा एक सामान्य प्रकार म्हणजे मेनिन्जिओमा. जो मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या सभोवतालच्या संरक्षणात्मक स्तर असलेल्या मेनिन्जेसपासून उद्भवतो. मेनिन्जिओमा सामान्यत: हळू-वाढणारे आणि सहसा सौम्य असतात.

ट्यूमरचा आणखी एक प्रकार म्हणजे ग्लिओमा, जो मेंदूतील चेतापेशींना आधार देणाऱ्या ग्लिअल पेशींमुळे उद्भवतो. ग्लिओमाचे वर्गीकरण उपप्रकार जसे की ॲस्ट्रोसाइटोमा, ऑलिगोडेंड्रोग्लिओमास आणि एपेन्डीमोमासमध्ये केले जाऊ शकते. म्हणूनच या घातक स्थितीचे निदान झालेल्या रुग्णांसाठी योग्य उपचार ठरवण्यासाठी या विविध प्रकारच्या मेंदूच्या गाठींचा अभ्यास करणे आणि त्या समजून घेणे महत्त्वाचे आहे.

ब्रेन ट्यूमरचे लक्षणं

ट्यूमर विविध मेंदूच्या पेशींमध्ये असतात, ज्यामुळे डोकेदुखी, झटके येणे, शारीरीक संतुलन गमावणे, दृष्टी दोष आणि ऐकु येण्याच्या क्षमतेत बदल, स्मृतीसंबंधी समस्या, शरीराच्या एका भागात किंवा एका बाजूला अशक्तपणा किंवा अर्धांगवायू, चक्कर येणे, बोलताना अडखळणे, चेहऱ्याचा सुन्नपणा हे ब्रेन ट्यूमरचे अशी विविध लक्षणे दिसून येतात.

ब्रेन ट्यूमर होण्याचे कारणं

ब्रेन ट्यूमर मागील नेमके कारण अनेकदा अज्ञात असते. किरणोत्सर्गाच्या संपर्कात येणे किंवा काही अनुवांशिक परिस्थिती यासारखे जोखीम घटक विकसित होण्याची शक्यता वाढवतात.

ब्रेन ट्यूमरचे निदान

ब्रेन ट्यूमरचे निदान एमआरआय, सीटी स्कॅन आणि बायोप्सीद्वारे केले जाऊ शकते. ट्यूमरचे स्थान, वय, ट्यूमरचा प्रकार आणि आकार यावर आधारित उपचार केले जातात. उपचार करणारे डॉक्टर तुमच्या एकूण आरोग्याचा विचार करून योग्य उपचार योजना ठरवतात.

काय आहेत उपचार?

ट्यूमर काढून टाकण्यासाठी आणि मेंदूला होणारे नुकसान कमी करण्यासाठी मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या (क्रॅनिओटॉमी) स्वरूपात उपचार केले जातात. शंट्स, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी, केमोथेरपी, रेडिओसर्जरी आणि टार्गेटेड थेरपी देखील ब्रेन ट्यूमर असलेल्यांसाठी वरदान ठरू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner