Stroke Symptoms: वेळीच ओळखा स्ट्रोकची लक्षणं, आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Stroke Symptoms: वेळीच ओळखा स्ट्रोकची लक्षणं, आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

Stroke Symptoms: वेळीच ओळखा स्ट्रोकची लक्षणं, आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

HT Marathi Desk HT Marathi
Published May 22, 2025 12:40 PM IST

Health Tips: आपल्या आरोग्याची काळजी घेताना काही लक्षणे वेळीच ओळखली तर त्यावर लवकर उपचार करता येतो. स्ट्रोकची लक्षणे येथे जाणून घ्या.

स्ट्रोकची लक्षणं
स्ट्रोकची लक्षणं ( freepik)

Symptoms of Stroke: भारतात दिवसेंदिवस स्ट्रोकचे रुग्ण वाढत चालले आहेत. यासाठी वेळीच उपचारांची आवश्यकता आहे. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे जी मेंदूच्या एखाद्या भागात रक्त प्रवाहात व्यत्यय आल्यास उद्भवते आणि त्यामुळे मेंदूचे नुकसान होते. खारघर, नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे वरिष्ठ न्यूरोसर्जन, न्यूरोइंटरव्हेन्शनिस्ट आणि स्पाइन सर्जन डॉ. मधुकर नायक यांनी स्ट्रोकची लक्षणे कोणती आहेत याबाबत माहिती दिली.

ही आहेत स्ट्रोकची लक्षणे

बोलण्यात अस्पष्टता : स्ट्रोकची समस्या असलेल्या व्यक्तीला बोलण्यात अडचणी येणे किंवा बोलताना अडखळणे अशी समस्या उद्भवते. अस्पष्ट उच्चार, चुकीचे उच्चार किंवा अजिबात बोलता न येणे अशा समस्या आढळून येतात. मेंदूच्या काही विशिष्ट भागावर परिणाम झाल्यामुळे हे लक्षण दिसून येते.

चेहऱ्याचा पक्षाघात : स्ट्रोकचा एक प्रभावी संकेत म्हणजे चेहऱ्याच्या एका बाजूस होणारा पक्षाघात. स्ट्रोकमुळे चेहऱ्याच्या स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम होतो म्हणून चेहऱ्याची एक बाजू सुन्न पडते.

हातांमधील अशक्तपणा : स्ट्रोकच्या रुग्णाला एका बाजूच्या हाताला अचानक अशक्तपणा किंवा सुन्नपणा जाणवू शकतो. जर तुम्हाला स्ट्रोक झाल्याचा संशय असेल तर त्या व्यक्तीला दोन्ही हात वर करण्यास सांगा. जर एक हात उचलता येत नसेल तर ते स्ट्रोकचे लक्षणे असू शकते.

संतुलन गमावणे : चक्कर येणे, समन्वय साधण्यास अडचणी येणे किंवा चालण्यास त्रास होणे म्हणजे एखाद्याला स्ट्रोकची समस्या आहे असे समजणे.

स्ट्रोकची लक्षणे ओळखण्यासाठी ‘बीफास्ट’ (BEFAST) ह्या संज्ञेचा वापर केला जातो. यात प्रत्येक अक्षर एक महत्त्वपूर्ण लक्षण दर्शवते.

B – बॅलेंस (Balance): स्ट्रोक झालेल्या व्यक्तीला अचानक संतुलन बिघडण्याचा अनुभव येतो. त्यांना नीट उभे राहता येत नाही किंवा चालताना अस्थिरता येऊ शकते. एकंदरीत, रुग्णाला बॅलन्स करता येत नाही.

E – आईज (Eyes): स्ट्रोकमध्ये डोळ्यांच्या दृष्टीवर तात्काळ परिणाम होऊ शकतो. एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये अचानक अंधुकपणा किंवा दृष्टी कमी होणे ही लक्षणे असू शकतात. दृष्टीत त्रास उद्भवतो.

F – फेस (Face): चेहरा हा स्ट्रोकमधील मुख्य लक्षणांपैकी एक आहे. स्ट्रोक झाल्यास चेहऱ्याच्या एका बाजूला तिरकसपणा येतो, त्या व्यक्तीला हसणे कठीण होते किंवा चेहऱ्याचे काही भाग सुस्त होतात.

A – आर्म्स (Arms): स्ट्रोकमुळे हाताचे कार्यप्रणाली कमी होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला हात उचलताना अडचण येते, आणि हातात वजन राहत नाही.

S – स्पीक (Speak): स्ट्रोक मध्ये बोलण्यास अडचणी येतात. पीडित व्यक्तीची जीभ अडखळू लागते, शब्द नीट उच्चारता येत नाहीत किंवा काही वेळा ती व्यक्ती अजिबात बोलू शकत नाही.

T – टाइम (Time): वेळ हा स्ट्रोकच्या उपचारांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. स्ट्रोकची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेणे अत्यंत गरजेचे असते.

ही लक्षणे त्वरित ओळखून त्यानुसार वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. यावरील उपचार हे स्ट्रोकच्या प्रकारावर अवलंबून असतात. इस्केमिक स्ट्रोकवर रक्त पातळ करणाऱ्या किंवा रक्त गोठण्यास प्रतिबंध करणाऱ्या औषधांनी उपचार केले जातात, तर रक्तस्त्राव थांबविण्यासाठी आणि रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते. वेळीच व्यवस्थापन न केल्यास स्ट्रोकमुळे कायमचे अपंगत्व किंवा अर्धांगवायू होऊ शकतो. बरे होण्यासाठी शारीरिक उपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्या लागणाऱ्या औषधांचा समावेश असू शकतो.

स्ट्रोक टाळण्यासाठी, रक्तदाब व्यवस्थापित करा, मधुमेह नियंत्रित करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा, पौष्टिक आहाराचे सेवन करा आणि दररोज व्यायाम करा. नियमित आरोग्य तपासणी देखील स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते. स्ट्रोकच्या वाढत्या घटना लक्षात घेता, तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

वेळ मौल्यवान असून त्वरीत रुग्णाला योग्य रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. कारण, जर वेळीच निदान आणि उपचार केले तर स्ट्रोकची लक्षणे आणि चिन्हे जवळजवळ पूर्णपणे उलटणे आणि आयुष्यभर आजार टाळणे शक्य आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner