Junk Food Effects: सावधान! मुलांना जंक फूड देणे पडू शकते महागात, आरोग्यावर होतो दुष्परिणाम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Junk Food Effects: सावधान! मुलांना जंक फूड देणे पडू शकते महागात, आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Junk Food Effects: सावधान! मुलांना जंक फूड देणे पडू शकते महागात, आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Published Sep 22, 2023 11:03 PM IST

Parenting Tips: आजकाल मुलांना पौष्टिक आहाराऐवजी जंक फूड किंवा पॅक्ड फूड खायला जास्त आवडते. हे खाण्यामागचे कारण आणि त्याचा मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या.

मुलांनी जंक फूड खाण्याचे दुष्परिणाम
मुलांनी जंक फूड खाण्याचे दुष्परिणाम (unsplash)

Side Effects of Eating Junk Food and Packed Food For Kids: घरी बनवलेली भाजी पोळी पाहून नाक मुरडनारी मुले जंक फूड पाहून खुश होतात. जंक फूड किंवा पॅक्ड फूड खायला टेस्टी वाटत असले तरी ते दीर्घकाळ सेवन केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम करते. आजकाल फक्त मोठेच नाही तर लहान मुले सुद्धा नियमित जंक फूड आणि पॅक्ड फूड खाताना दिसतात. मुलांच्या आहारामध्ये पॅक्ड फूड किंवा जंक फूडचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. जसे बिस्कीट, मॅगी, चिप्स, कुरकुरे, ब्रेड, खारी, पिझ्झा, टोस्ट, बर्गर, केक, पेस्ट्री या पदार्थांचा वापर मुलांच्या आहारात केला जात आहे. जास्त जंक फूड खाणाऱ्या मुलांना भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय त्यांच्या शारीरिक विकासावरही विपरित परिणाम होतो. मुलांना जंड फूड खायला का आवडते आणि ते खाल्ल्याने आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो हे जाणून घ्या.

जंक फूड खाण्यामागचे कारणे

सहज उपलब्धता

पॅक्ड फूड तुम्हाला सहज कुठेही, केव्हाही आणि कमी किमतीत मिळू शकते. अगदी दुर्गम भागात देखील ते सहज उपलब्ध होते. घरी बनवण्यासाठी मेहनत, वेळ किंवा साहित्य लागत नाही. त्यामुळे ते लगेच विकत घेऊन मुलांना खायला देणे पालकांना सोयीचे व सोपे वाटते.

आकर्षक सजावट

घरी बनवलेल्या जेवणाच्या तुलनेत जंक फूड आणि पॅक्ड फूडच्या पाकीटांची सजावट आकर्षक असते. त्यामुळे पालक तसेच लहान मुले सुद्धा त्याकडे आकर्षित होतात. आणि यामुळे हे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते.

चटपटीत चव

जंक फूड किंवा पॅक्ड फूडमध्ये वापरण्यात येणारे मीठ, साखर आणि कुरकुरीतपणा यामुळे हे घरी बनवलेल्या पदार्थांपेक्षा अधिक टेस्टी लागतात. त्यामुळे मुलांना या चवीची चटक लागून खाण्याची लालसा वाढते.

जंड फूड खाण्याचे दुष्परिणाम

पोषक तत्वांचा अभाव

जंक फूडमध्ये पोषकतत्वांचा खूप अभाव असतो. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यास मुलांना उर्जेव्यतिरिक्त कोणताही पोषक घटक मिळत नाही. त्यामुळे मुलांचे वजन वयानुसार योग्य प्रमाणात वाढत नाही. शिवाय इतर पोषक घटकांच्या अभावामुळे होणारे आजार होण्याची शक्यता वाढते.

भूकेची जाणीव

सतत अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे मुलाचे आपल्या भुकेवर नियंत्रण राहत नाही. कधी कधी त्यांना भूक लागल्याची जाणीव होत नाही. तर कधी कधी हे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले जाते. म्हणजेच पोट भरल्याची जाणिव होत नाही.

लठ्ठपणा

जंक फूडमध्ये जास्त कॅलरीज देणारे घटक असल्याने वजन वाढते. तसेच त्याच्या अतिरेकी सेवनाने मुले लठ्ठपणााचे शिकार होतात. यातील फॅट लठ्ठपणा वाढवण्यासोबत अनेक आजारांना नियंत्रण देते.

 

विविध आजारांना आमंत्रण

जंक फूडमध्ये कोणतीही पौष्टिकता नसते. त्यांना पचविणे अवघड जाते. त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण दिले जाते. ही मुले लठ्ठ दिसतात, पण सुदृढ नसतात. त्यामुळे ते सतत वेगवेगळ्या संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. सोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर सुद्धा विपरित परिणाम होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner