Side Effects of Sugar Free Tablets: साखरेचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहता फिटनेस फ्रीक लोकांनी आपल्या आयुष्यात त्याची जागा आर्टिफिशियल स्वीटनर किंवा शुगर फ्री गोळ्यांना दिली आहे. आपल्या रुटीनमध्ये हा बदल केल्याने बहुतेक लोकांना असे वाटते की शुगर फ्री गोळ्या त्यांची साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील आणि त्यांचे आरोग्य देखील चांगले ठेवतील. आत्तापर्यंत तुम्हीही हा विचार करून चहा, कॉफीमध्ये शुगर फ्री गोळ्या आणि आर्टिफिशियल स्वीटनर वापरत असाल तर जरा थांबा आणि डब्ल्यूएचओचा अहवाल आणि कॅनडातील या संशोधनावर एक नजर टाका.
खरं तर डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार जगभरात जवळपास ४० कोटी लोक मधुमेहाच्या आजाराचे बळी आहेत. या धोकादायक आजारात इन्सुलिनची पातळी असंतुलित होते. डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोणत्याही आर्टिफिशियल स्वीटनर, नैसर्गिक किंवा सिंथेटिकचा वापर खाण्यापिण्यात करू नये. वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यासाठी नॅचरल फ्रूट स्वीटनर अधिक फायदेशीर आहे.
कॅनडातील मॅनिटोबा विद्यापीठात झालेल्या एका संशोधनानुसार आर्टिफिशियल स्वीटनरचा पचनसंस्था आणि आतड्यांमधील जीवाणूंवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे व्यक्तीच्या भुकेच्या सवयीवर परिणाम होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की लोक स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनर वापरतात. पण हे करत असताना त्याचे अतिसेवन आपल्याला लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित आजारांकडे ढकलत असतो, याची त्यांना जाणीव नसते. दुसऱ्या शब्दांत आर्टिफिशियल स्वीटनरमध्ये कॅलरी कमी असू शकतात. परंतु ते आरोग्यासाठी बरेच दुष्परिणाम आणतात. त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे शरीरात जळजळ होऊ शकते आणि यकृतही कमकुवत होऊ शकते. आरोग्यासाठी आर्टिफिशियल स्वीटनर आणि शुगर फ्री गोळ्या घेण्याचे काय दुष्परिणाम आहेत ते जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते आर्टिफिशियल स्वीटनरचे सेवन करताना व्यक्तीच्या मेंदूत असा संदेश जातो की, त्यातील कॅलरीजचे प्रमाण कमी आहे. ज्यामुळे व्यक्ती जास्त प्रमाणात सेवन करू लागते. परंतु आर्टिफिशियल स्वीटनरचा कृत्रिम गोडवा आपली भूक वाढवून आपल्यासाठी लठ्ठपणाची समस्या वाढवू शकतात. मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या एका संशोधनानुसार, शुगर फ्री मुळे बारीक होण्यास अजिबात मदत होत नाही. यामुळे चयापचय आणि भूक यावर विपरीत परिणाम होतो.
शुगर फ्री गोळ्या हृदयाच्या आरोग्यास हानी पोहोचवतात. जे लोक दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा आर्टिफिशियल स्वीटनरपासून बनवलेल्या पेयांचे सेवन करतात, तर यामुळे त्यांचा रक्तदाब वाढू शकतो आणि लोकांमध्ये उच्च रक्तदाब, हार्ट प्रॉब्लेम आणि कोरोनरी हृदयरोग यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
आर्टिफिशियल स्वीटनरमध्ये असलेले एस्पार्टेम उच्च तापमानात फॉर्मिक अॅसिडमध्ये मोडते. ज्यामुळे एलर्जीची समस्या व्यक्तीला सतावू शकते. डोकेदुखी, मळमळ, सांधेदुखी, झोप न येणे, घबराट येणे इत्यादी त्याचे काही दुष्परिणाम आहेत, जे काही लोकांमध्ये दिसून येतात.
शुगर फ्री स्वीटनर किंवा गोळ्या मर्यादीत प्रमाणात वापरण्यास सुरक्षित मानल्या जातात. परंतु आपल्या आहारात कोणतेही नवीन घटक समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)