मायोपिया आणि मोबाइल गेमिंग: एक छुपं कनेक्शन, जाणून घ्या सविस्तर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मायोपिया आणि मोबाइल गेमिंग: एक छुपं कनेक्शन, जाणून घ्या सविस्तर

मायोपिया आणि मोबाइल गेमिंग: एक छुपं कनेक्शन, जाणून घ्या सविस्तर

HT Marathi Desk HT Marathi
Published May 29, 2025 12:44 PM IST

मोबाईल गेम आणि मायोपिया यांच्यात छुपे कनेक्शन आहे. मोबाईल गेममुळे डोळ्यांवर कसे परिणाम होतात ते जाणून घ्या.

Myopia
Myopia (unsplash)

Connection Between Myopia and Mobile Gaming: मायोपिया किंवा जवळचं पाहाता न येणं म्हणजेच लोकांना फार लांबचं दिसत नाही. त्यांना स्पष्ट दिसण्यासाठी मायनस नंबरच्या चष्म्याची गरज असते. मायोपिया कोणत्याही वयात उद्भवू शकतो. मायोपिया आणि मोबाईल गेम यांच्यात एक प्रकारचे छुपे कनेक्शन आहे. पिंपरी चिंचवड येथील डॉ अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटलच्या सल्लागार नेत्ररोग तज्ञ डॉ. सोनल ईरोले यांनी या बाबत सविस्तर माहिती दिली.

मायोपियाची कारण पुढीलप्रमाणे असू शकतात -

• बुबुळ विस्तारलेलं असणं

• अनुवंशिक

• खूप जवळून काम करावं लागणं इत्यादी

याआधी म्हणजे, १५ ते २० वर्षांपूर्वी शाळेत ४० मुलांच्या वर्गात एका किंवा दुसऱ्या मुलाला चष्मा असायचा, मात्र आता हे प्रमाण वाढत आहे. आता किमान ८ ते १० जणांना चष्मा असतो आणि ते ही लहान वयात.

हे कशामुळे घडत आहे?

काम खूप जवळून करावे लागण्याने किंवा मुलांमध्ये स्क्रीनच्या अधिक वापरामुळे हे होत आहे. गेम्स, अभ्यास, रील्स अथवा व्हिडिओज बघणे किंवा अशा इतर कारणांमुळे लहान मुलांचा स्क्रीनचा वापर सातत्याने होत असतो. यामुळे मुलांचा स्क्रीनटाइम वाढला असून तो २ ते ८ तासांइतका असू शकतो. यामुळे डोळ्यांना मिळणारी चालना अशा प्रकारे वाढते, की त्यातून डोळ्यातल्या बुबुळाचा आकार किंवा एक्सियल लेंथ (अक्षीय लांबी) वाढते व परिणामी मायोपिया होतो. अभ्यासाअंती असेही दिसून आले आहे, की स्क्रीन टाइममुळे दरवर्षी सम दरात ही वाढ होत आहे.

याचा अर्थ शारीरिकदृष्ट्या किंवा शरीराच्या विकासाच्या नैसर्गिक वाढीनुसार जर वर्षभरात चष्म्याचा नंबर ०.२५ ते ०.५ ने वाढत असेल, तर स्क्रीनच्या वापरामुळे तो आणखी म्हणजे वर्षागणिक ०.७५ किंवा अगदी १ डी ने ही वाढू शकतो. या प्रक्रियेमुळे १८ ते २१ वर्ष वयापर्यंत उच्च मायोपिया होऊ शकतो. अशावेळी लेसिकसारखी रिफ्रॅक्टिव्ह शस्त्रक्रिया करता येते. मात्र नंबर इतका जास्त असतो, की लेसिक करण्यात खूप जोखीम असते. शिवाय, अशावेळी वापरावे लागणारे चष्मे हाय- पॉवर ग्लासेसचे असल्यामुळे ते खूप जाड काचेचे असतात. तुम्हाला जर अशा प्रकारचा मायोपिया असेल, तर चष्म्याशिवाय तुमची दृष्टी खराब झालेली असते.

यावर उपाय काय?

आपल्या हातात प्रतिबंध करणं इतकंच आहे. म्हणजेच, मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणं. मग, मोबाइल अ‍ॅप्सवर येणाऱ्या अभ्यासाचं काय करायचं असा प्रश्न येतो, शिवाय शैक्षणिक व्हिडिओजही पाहायचे असतात.

मग यावर उपाय काय?

यावरचा उपाय म्हणजे, केवळ अशा कारणांसाठीच स्क्रीनचा वापर करायचा आणि त्यानंतर गेम्स किंवा टाइमपास म्हणून व्हिडिओ पाहाण्यात अनावश्यक वेळ घालवायचा नाही. अभ्यासासाठी व्हिडिओ किंवा डिजिटल मटेरियल पाहाताना मोठ्या स्क्रीन्स वापरा आणि मोबाइलसारख्या लहान स्क्रीन वापरू नका.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, रोज किमान एक तास मैदानावर खेळा. यामुळे तुमचा उत्साह आणि हालचाल वाढेल व पर्यायाने खेळण्यासाठी स्क्रीनवर अवलंबून राहावे लागणार नाही.

Whats_app_banner