मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Colours: रासायनिक रंगांनी होळी खेळल्याने होऊ शकते आरोग्याची मोठी हानी, पाहा बचाव करण्याचे उपाय

Holi Colours: रासायनिक रंगांनी होळी खेळल्याने होऊ शकते आरोग्याची मोठी हानी, पाहा बचाव करण्याचे उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 21, 2024 06:41 PM IST

Holi 2o24: होळीच्या रंगांमुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. रासायनिक रंगांनी होळी खेळल्याने आरोग्याला कोणते मोठे नुकसान होऊ शकतात ते जाणून घेऊया.

रासायनिक होळीच्या रंगांचा आरोग्यावर होणारा घातक परिणाम
रासायनिक होळीच्या रंगांचा आरोग्यावर होणारा घातक परिणाम (unsplash)

Harmful Effects of Holi Colours on Health: रंगांशिवाय होळीचा सण अपूर्ण मानला जातो. यावर्षी धुलिवंदन २५ मार्च रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी लोक एकमेकांना रंगीबेरंगी गुलाल लावतात. जरी पूर्वीच्या काळी लोक फुलं किंवा त्यांच्यापासून बनवलेल्या रंगांनी होळी खेळत असत, परंतु आज होळी खेळण्यासाठी रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. होळीच्या या रंगांमध्ये लीड ऑक्साईड, क्रोमियम आयोडाइड, कॉपर, सल्फेट, शिसे आणि ॲल्युमिनियम ब्रोमाइड सारखी रसायने असतात. ज्यामुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. रासायनिक रंगांनी होळी खेळल्यास आरोग्यासाठी कोणते मोठे नुकसान होऊ शकतात आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.

केमिकल असलेल्या होळीच्या रंगांमुळे आरोग्याच्या या समस्या उद्भवू शकतात

डोळ्यांच्या समस्या

रासायनिक रंगांमध्ये विशेषतः सिलिका आणि शिसे मिसळले जाते. हे रंग अगदी थोड्या प्रमाणातही डोळ्यांत गेल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते. अशा रंगांमुळे डोळ्यांच्या बाहुल्यांना त्रास होऊ शकतो आणि डोळ्यांना खाज सुटू शकते.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या

रासायनिक रंगांची होळी खेळताना जर ते जास्त प्रमाणात तोंडात गेले तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि पोटात संसर्ग यांसारख्या समस्या त्रास देऊ शकतात.

विषारीपणा

रासायनिक होळीचे रंग बनवताना त्यात शिसे, पारा, क्रोमियम आणि अमोनिया यांसारखी घातक रसायने वापरली जातात. अशा परिस्थितीत होळी खेळताना हे रंग चुकून तोंडात गेले किंवा त्वचेत गेले तर शरीरातील विषारीपणा वाढू शकतो. त्यामुळे शरीर कर्करोगासारख्या गंभीर आजारांनाही बळी पडू शकते. याशिवाय अशा रंगांमुळे गरोदर महिला आणि त्यांच्या विकसनशील गर्भालाही धोका निर्माण होऊ शकतो.

श्वासोच्छवासाच्या समस्या

होळीच्या रंगांमध्ये पारा, काच, सिलिका यासारखी धोकादायक रसायने मिसळली जातात. ज्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय या रंगांमुळे श्वसनाचे आजारही वाढू शकतात. त्यामुळे श्वास घेण्यास आणि खोकल्याला त्रास होऊ शकतो.

त्वचेशी संबंधित समस्या

रासायनिक रंगांनी होळी खेळल्याने पुरळ, जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा येऊ शकतो. काही लोक रंगांच्या एलर्जीची तक्रार करतात. ज्यामुळे त्वचेवर लहान पुरळ उठतात.

होळी खेळताना घ्या ही खबरदारी

- होळी खेळण्यासाठी नेहमी हर्बल कलर्सचा वापर करा.

- होळीच्या रंगांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा घाला.

- होळीच्या रासायनिक रंगांपासून आपला चेहरा आणि त्वचेचे रक्षण करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी अंगाला तेल लावा.

- चुकून डोळ्यात किंवा तोंडात रंग गेल्यास लगेच पाण्याने धुवा किंवा गुळणा करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग